सासर माहेर
Authors:
ISBN:
₹95.00
- DESCRIPTION
- INDEX
खानदेशातील कवितेला बहिणाबाई चौधरीच्या अक्षर काव्याचा वारसा लाभलेला आहे. त्यामुळे जीवनातील तत्त्वज्ञान तेवढ्याच सहजतेने मांडणार्या कविता येथे निर्माण झाल्या. बहिणाबाईंच्या काव्याची सहजता आणि उत्कटता या कविंच्या काव्यातून प्रकट होताना दिसून येते. ‘सासर-माहेर’ हा कविता संग्रह त्या मानाने अनेक बाबतीत वेगळा आहे. एक तर कवयित्रीचे वय हे आज नव्वदच्या घरात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा कविता संग्रह ‘अहिराणी’ बोलीमध्ये आहे. मराठीच्या उपबोली पैकी अहिराणी ही मोठ्या प्रदेशात बोलली जाणारी बोली भाषा आहे. कवयित्रीने मात्र आपले विचारधन हे आपल्याच बोलीत मांडले आहे त्यामुळे अहिराणी भाषेतील गोडवा तर या काव्याला प्राप्त झालाच तसेच काव्याद्वारे या बोली प्रदेशातील सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमीची जोडही दिली.
स्त्री ही समाजामध्ये अनेक रुपात वावरते, मुलगी, सून, आई, मैत्रिण, आजी ही परिचित असलेली स्त्रीरुपे. या रुपांच्या मागे कुठलीतरी वेदना कार्य करीत असते. या वेदना, अपेक्षांची ओझेही वाहत असते. परंतु वेदना कितीही असल्यातरी त्याचे प्रदर्शन मात्र करता येत नाही. ही स्त्रीरुपे पालटत असतात की एका वेदनेचे दुसर्या वेदनेत रुपांतर होत असते, हे समजणे जरा कठीणच असते. या पालटत जाणार्या स्त्री रुपाचे वर्णन कवयित्रीने या काव्याच्या माध्यमातून केले आहे. स्त्रीयांच्या वाट्याला येणारे दुय्यमत्त्व, तिची अगतिकता या काव्यात दिसून येते. परंतु जे विध्यात्याने लिहिले नशिबी या प्रमाणे या कविता प्रारब्दाच्या मार्गाने वळत नाही. तर प्रत्येकच कवितेतून एका स्त्रीचा स्वाभिमान डोकावताना दिसून येतो. या कवितेतील स्त्री स्वाभिमानाने आपल्या माहेरचे गोडवे गाते. तर तितक्याच समर्थपणे आपल्या संसाराचा आधार बनते.
Sasar Maher