Your cart is empty now.
अशोक नामदेव पळवेकर यांची कविता आपल्या समकालीन सामाजिक-राजकीय वास्तवाची एक प्रगल्भ कालसंहिता आहे.
भारतीय समाजव्यवस्थेतील आजचे वास्तव मांडताना ही कविता सभोवतालच्या सामान्य माणसांच्या जगण्यातील ताण-तणावांसोबतच समाजातील धार्मिक-जातीय असहिष्णुता, क्रौर्य, दहशत, पुरुषसत्ताक हिंस्रता आणि अलीकडच्या काळातील सत्ताधीशांच्या वर्तनातील सामाजिक-राजकीय पाखंड व मूलतत्त्ववादी विचारसरणीतून फोफावत जाणारा धार्मिक-सांस्कृतिक उन्माद व कट्टरतावाद इत्यादींच्या आत्यंतिक प्रभावाखाली उद्ध्वस्त होत जाणारी लोकशाही यंत्रणेतील सामाजिक व मानवी मूल्ये; तसेच भांडवली आक्रमकता, सत्ताशरण माध्यमे-प्रशासन-न्याययंत्रणा वगैरेंची वेगवेगळी वास्तवरुपेही अत्यंत उग्र व आक्रमक स्वरुपात आपल्या स्वतंत्र शैलीने अभिव्यक्त करते.
आंबेडकरवादी जीवनदृष्टीतील संवेद्यता ही या कवितेची प्रकृती असून विश्वमानवतावादाच्या व्यापक परिघ-केंद्राशी या कवितेची नाळ जुळलेली आहे. त्यामुळेच ही कविता सभोवतालच्या मानवी दुःखजाणिवांशी अगदी सहजीभावाने एकरुप होते; आणि न्याय-अन्यायाच्या टोकदार संघर्षात न्यायाच्या बाजूने आपली निर्णायक भूमिका जाहीर करते. विवेकशील लढवय्येपण हा या कवितेचा एक महत्त्वाचा पैलू असल्याने मानव्यपातळीवरील विश्वसंवेदना व जीवनजाणिवांचे ऐतिहासिक संचित या कवितेतून अव्याहतपणे प्रवाहित होताना दिसते; आणि सामाजिक दुःख जाणिवेचे एक कारुण्यमय व विद्रोही दर्शन त्यातून प्रगल्भपणे साकार होते.
या कवितेतील तत्त्वचिंतन आणि समकालीन वास्तवाचे एकूणच भान लक्षात घेता ही कविता म्हणजे आपल्या समकाळाच्या सामाजिक-राजकीय पर्यावरणातील अत्यंत कडवट व उष्ण रंग दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या स्थितिगतीच्या कालकल्लोळाचा एक मौलिक ऐवज आहे.
Asahmatiche Rang