Your cart is empty now.
श्री. पं. ना. दादांच्या एकूणच पद्य लेखनाकडे पाहता त्यांच्यातला शिक्षक आणि लोकशिक्षक शेवटपर्यन्त मनी हृदयी ठाण मांडून बसतो. सेवानिवृत्तीनंतर ‘आता उरलो उपकारा पुरता’ या उक्तीचे सारतत्व त्यांच्या लेखनकृतीतून गडद होतांना दिसते. बर्याचदा नवकवींमध्ये अनुकरणप्रियता स्वलेखनातून प्रकर्षाने जाणवते. पं. ना. दादांच्या लेखनाचं हे वैशिष्ट्य म्हणून जी नोंद आवर्जून करता येईल ती म्हणजे त्यांच्या कोणत्याही रचनेत दुसर्या इतरेजनांचे अनुकरण नाहीय. त्यांच्या सगळ्या पद्यावर त्यांचीच मुद्रा उमटलेली दिसते.
आत्मपरीक्षण व आत्ममग्नता या दोन घटकांना त्यांनी लेखनमूळाशी स्थित केलेले बर्याच कवितांमध्ये दिसून येते. वर्तमानाची मानसिकता तिचे ग्रासलेपण त्यातून होणारी नितीमूल्यांची पडझड यामुळे कवी वारंवार विषण्ण होतो. प्रसंगी उपहास व उपरोध या भाषिक शस्त्रांचा आधार घेत त्यांचे कवीमन त्या त्या विकृतीला व विकोपाला चांगलेच धारेवर धरते. त्यांच्या भावनांचं हे विरेचन त्यांच्यातल्या सकारात्मकतेचं दर्शन तर घडवितातच शिवाय संस्कृतीरक्षणार्थ त्यांची होणारी मनस्वी तगमगही वाचक मनातून भरून वाहते. हे पं. ना. दादांच्या लेखनाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
– वा. ना. आंधळे