Your cart is empty now.
श्रीसंत आदिशक्ती मुक्ताई आरती
नित्यमुक्त तुज ओवाळीन मी मुक्ताई माते ।
आत्मज्योतीने ब्रह्मज्योतीला आळवितो माते ॥धृ॥
विठ्ठल-रूक्मिणी आईबाप तंव कठीण व्रतचरणी ।
निवृत्ति सोपान ज्ञानदेव हे बंधू बुधवाणी ।
संतमंडळी मुक्ताई तूं सान ज्ञानवंते ॥1॥
शिष्यपुत्र तंव चांगदेव हा चौदा शतकांचा ।
विसोबा खेचर शिष्योत्तम हरी गर्व नामयाचा ।
मुक्ताई तूं स्वयंमुक्त भवबंध विमुक्ते ॥2॥
प्रथम विरक्ति निवृत्तीची ज्ञानवंत होणे ।
सायुज्याच्या सोपानाने मुक्त श्रेष्ठ होणे ।
मुक्ताई तूं हीच शिकवणी नित्य आम्हा दे ॥3॥
संतांची तूं मुक्त विरक्ति भक्तांची भक्ति ।
ज्ञानाचे गे ज्ञान आणि तूं कर्मयोग मुक्ति ।
‘दाशरथी’ची साध्य-साधना तूंच सर्व माते ॥4॥