Your cart is empty now.
लोकसंख्या भूगोल ही अगदी अलीकडे विकसित झालेली ज्ञानशाखा असून, मानव हा अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. या विषयात मानवाबरोबरच मानवी जीवनाशी संबंधित प्राकृतिक व अप्राकृतिक अशा घटकांचाही अभ्यास समाविष्ट होतो. प्रदेशानुसार प्राकृतिक घटकांमध्ये विविधता आढळते. या प्राकृतिक/भौगोलिक विविधतेचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिरणाम त्या त्या भौगोलिक प्रदेशात वास्तव्य असणार्या मानवी समुहाच्या जीवनावर होत असतो. यामुळेच भिन्न भिन्न हवामान प्रदेशांत राहणार्या मानवाच्या जीवनातही विभिन्नता आढळून येते. तसेच लोकसंख्येचे वितरणही सर्वत्र सारखे नाही. कारण लोकसंख्येच्या क्षेत्रीय वितरणावर प्राकृतिक, सांस्कृतिक व आर्थिक घटकांचा परिणाम होतो. या घटकांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. यामुळेच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप बहुव्यापी व बहुस्पर्शी असे असल्याचे दिसून येते. लोकसंख्या भूगोल गतिमान व परिवर्तनशील असा अभ्यासविषय आहे. या विषयात प्रामुख्याने मानव व त्यासंबंधित पर्यावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो. हे दोन्ही घटक गतिमान व परिवर्तनशील आहेत. पृथ्वीवर सतत काही ना काही घडामोडी होत असतात. या घडामोडींचा परिणाम पर्यावरणावर होत असतो. मानव स्वत:च गतिमान व परिवर्तनशील प्राणी आहे. मानव आपल्या सुप्त गुणांचा वापर नेहमी करत असतो. त्यामुळेही भौगोलिक व अभौगोलिक बदल पर्यावरणात होत असतात. या बदलांचा परिणाम मानवी जीवनावर होतो. लोकसंख्याविषयक घटकांमध्येही नेहमी बदल होतात. या सर्व प्रकारच्या बदलांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. म्हणूनच लोकसंख्या भूगोलाचे स्वरुप गतिमान व परिवर्तनशील असे आहे.