Your cart is empty now.
अनंता सूर या नव्या दमाच्या अभ्यासकाने संपादित केलेले ‘आंबेडकरी निष्ठेचा विचारवाहक: वामनदादा कर्डक’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे ही अत्यंत आनंददायी घटना आहे. वामनदादांच्या जन्मशताब्दी वर्षाचा संदर्भ या संपादनाला आहे. हे मौलिक संपादन करून अनंता सूर यांनी वामनदादांना कृतज्ञतापूर्वक अभिवादनच केलेले आहे. या मौलिक कार्यासाठी मी त्यांना धन्यवादही देतो आणि त्यांचे अभिनंदनही करतो.
वामनदादा महाप्रतिभावंत होते. बाबासाहेबांचे इहकेंद्री समन्यायी तत्त्वज्ञान त्यांनी लोकांच्या मनांमध्ये प्रस्थापित केले. आंबेडकरी चळवळीतील चढउतारही त्यांनी जिवाच्या आकांताने मांडले. बाबासाहेबांनी उभारलेल्या संग्रामात त्यांनी महायोद्ध्याची भूमिका केली. बाबासाहेबांच्या चळवळीतले ते सौत्रान्तिक महाभिक्खू होते. त्यांच्या हयातीतच वामनदादा एक अनोखी आणि तेजःपुंज महाआख्यायिका झाले होते. या महाआख्यायिकेचा वेध घेणारे अनेक मान्यवरांचे लेख वाचकांना या पुस्तकात वाचायला मिळतील. या लेखांसोबतच वामनदादांचे साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण आणि वामनदादांसंबंधीच्या दोन मुलाखतीही या पुस्तकात वाचायला मिळतील.
या मौलिक पुस्तकाचे संपादक अनंता सूर यांना वामनदादांचे सर्वच चाहते मनापासून धन्यवाद देतील ही खात्री मला आहे.