Your cart is empty now.
अलीकडील वीस ते पंचवीस वर्षात तंत्रज्ञानाचा विकास झाल्यापासून माणसाची प्रगती मोजण्याचे निकष किंवा निर्देशक बदललेले दिसतात. भौतिक सुख सोयींना महत्त्व आलेले दिसते. भौतिक सुख सोयी उपलब्ध करून देणारा पैसा सर्वोच्च महत्त्वाचा ठरला आहे. कोणत्या का भ्रष्ट किंवा अनैतिक मार्गाने असेना, ज्याला जास्त पैसा कमावता येईल तो मनुष्य श्रेष्ठ समजला जात आहे. अशा माणसाची समज, बुद्धी आणि व्यक्तिमत्त्व मोठं असे पण लोकांना वाटू लागले आहे. यामुळेच संपूर्ण देशभरात राजकारण हे पैसा कमावण्याचे मोठे साधन ठरत आहे. पैसा असला की हमखास निवडणूक जिंकता येते आणि सत्ता प्राप्त झाली की पुन्हा पैसा कमावता येतो. पैसा आणि सत्ता असले की आपोआप प्रतिष्ठा मिळते, असं जणू सूत्र बनलेलं आहे. त्यामुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत, तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत राजकारणाबद्दल आकर्षण वाढलेले आहे. व्यक्तिमत्त्व मोजण्याचे अलीकडचे निकष म्हणजे कमी अवधीत भरपूर पैसा, सत्ता व प्रतिष्ठा कमावण्याची क्षमता! पैसा कमावण्याचे साधन योग्य असो की अयोग्य, पैसा कमावतांना साधनशुचितेचे पालन होवो अथवा न होवो, गडगंज पैसा कमावणारा स्मार्ट समजला जात आहे. धनवान आपोआप बुद्धिवंत समजला जात आहे. सरकारी पैशांचा अपहार करणारा, समाजाचे शोषण करणारा, आपल्या पोरा बाळांसाठी चोरी करणारा, आत्मकेंद्रित मनुष्य निकृष्ट दर्जाचा असला तरी समाजकारणी आणि मौल्यवान समजला जात आहे. समाजातील ज्या लोकांचा कोणत्याही मूल्यांची संबंध नाही. अशांना प्रतिष्ठित मानलं जात आहे. “व्यापार सचोटीने करावा, संपत्ती कष्टाने कमवावी” असे महात्मा गांधींनी सांगून ठेवलेले आहे. या तत्त्वांचा वापर करून प्रामाणिकपणे संपत्ती कमवणारे व्यापारी, उद्योजक, बुद्धिवंत इत्यादींमध्ये कष्ट करण्याचा प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता असते. यांनी कमावलेल्या संपत्तीतून हे प्रामाणिकपणे देशाचा कर भरतात, अनेक बेरोजगारांना रोजगार देतात, समाजात सुख शांती निर्माण करण्यासाठी यांचेही योगदान असते. म्हणजे यांच्यात “व्यक्तिमत्त्व नीतिमत्ता किंवा व्यक्तिमत्त्व मूल्ये” असतात असे म्हणता येते.
लोकभावनांच्या पलीकडे जाऊन समाज आणि राष्ट्रउद्धारासाठी समर्पित जीवन जगणारे, परदुःख दूर करण्यासाठी झटणारे परोपकारी लोक हे राष्ट्रीय पुरुष असतात. हे प्रामाणिक असतात, नैतिक असतात, सेवाभावी असतात, त्याग भावना जोपासणारे असतात, जबाबदार असतात, व्यापक समदृष्टीचे असतात, सहनशील असतात, न्यायी असतात, विवेकी असतात, विज्ञाननिष्ठ असतात,
सामाजिक दृष्ट्या संवेदनशील असतात, यांच्यात तत्त्वाधिष्ठित धारणा असतात, हे परोपकारी असतात, अग्रकर्मी असतात, समाजनिष्ठ व राष्ट्रनिष्ठ असतात, हे आध्यात्मिक असतात, प्रतिभावंत असतात. प्रज्ञावंत असतात म्हणजे ते जीवनभर ‘चारित्र्यमूल्ये’ जोपासतात. ते चारित्र्यसंपन्न असतात.
आजचा काळ हा झगमगाट, गती, स्पर्धा आणि दृश्य यशाचा आहे. पद, पैसा, प्रसिद्धी, कौशल्य, संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास यांनाच यशाची मुख्य मोजमापे मानली जात आहेत. व्यक्तीचे मूल्यमापन बहुधा तो कसा दिसतो, कसा बोलतो, कसा सादर होतो यावर आधारित होत आहे. परंतु या सर्व बाह्य निकषांच्या गर्दीत एक अत्यंत मूलभूत, परंतु निर्णायक घटक हळूहळू विस्मरणात जात आहे, तो म्हणजे चारित्र्य! प्रामाणिकपणा, नैतिकता, जबाबदारी, आत्मसंयम, निष्ठा, कर्तव्यबुद्धी, करुणा, सत्यनिष्ठा आणि मूल्यनिष्ठ जीवनशैली हे गुणधर्म केवळ नैतिक भाषणांचे विषय राहिले असून, प्रत्यक्ष मूल्यमापनातून ते दूर सरकत चालले आहेत. आज माणूस काय आहे यापेक्षा तो कसा भासतो याला अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे चारित्र्य हा व्यक्तीच्या आंतरिक विकासाचा जो खरा निर्देशक आहे, तो समाजाच्या मोजपट्टीतून जणू गायब झाला आहे.
विज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सुविधा यांच्या अभूतपूर्व प्रगतीमुळे मानवाने बाह्य विकासात प्रचंड झेप घेतली आहे. परंतु याच वेगात आंतरिक विकास मात्र मागे पडलेला दिसतो. आजचा आधुनिक मानव अधिक सक्षम आहे; पण तो अधिक समाधानी आहेच असे नाही. तो अधिक जाणकार आहे; पण अधिक संवेदनशील झाला आहेच असे नाही. ताणतणाव, असुरक्षितता, स्पर्धा, नैराश्य, आत्मकेंद्रितता, मूल्यसंघर्ष, नातेसंबंधातील ताण, नैतिक संभ्रम ही सर्व लक्षणे आधुनिक मानवाच्या आंतरिक संकटाचीच रूपे आहेत. हा संघर्ष केवळ आर्थिक किंवा सामाजिक नाही; तो मुळात आत्मिक व नैतिक आहे. या पार्श्वभूमीवर आंतरिक विकास हा ऐच्छिक विषय न राहता, तो मानवाच्या संतुलित, आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण जीवनासाठी अनिवार्य गरज बनला आहे आणि आंतरिक विकासाचे सर्वात ठोस, दृश्यमान आणि विश्वसनीय मोजमाप म्हणजे चारित्र्य!
आधुनिक काळात ‘व्यक्तिमत्त्व विकास’ ही एक मोठी उद्योगव्यवस्था बनली आहे. आत्मविश्वास, सादरीकरण, प्रभावी संभाषण, देहबोली, आकर्षक प्रतिमा, नेटवर्किंग हे सर्व कौशल्ये निश्चितच उपयुक्त आहेत. परंतु ही सर्व साधने प्रामुख्याने बाह्य प्रतिमेशी संबंधित आहेत. याउलट चारित्र्य हे आंतरिक वास्तवाशी संबंधित असते. व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकांना आपण कसे दिसतो, तर चारित्र्य
म्हणजे आपण प्रत्यक्षात कसे आहोत. व्यक्तिमत्त्व मंचावर घडते; चारित्र्य एकांतात घडते. व्यक्तिमत्त्व प्रसंगानुसार बदलू शकते; चारित्र्य मात्र सवयींमधून, निर्णयांमधून आणि मूल्यांमधून घडत जाते. या दोहोंमध्ये गोंधळ निर्माण झाला की समाजात एक मोठा भ्रम निर्माण होतो. ‘चांगले सादरीकरण म्हणजे चांगली माणुसकी’ हा भ्रम मोडून काढणे आणि वास्तव समोर आणणे हे आज अत्यंत गरजेचे झाले आहे. ‘चारित्र्य-शुद्ध अंतःकरणाचे प्रकटीकरण’ हे पुस्तक केवळ नैतिक उपदेशांचे संकलन नसून, ते आंतरिक विकासाच्या शास्त्रीय, तत्त्वज्ञानात्मक आणि व्यवहार्य समजुतीवर आधारित आहे. या पुस्तकाची भूमिका अशी आहे की चारित्र्याची संकल्पना आधुनिक संदर्भात पुनर्स्थापित करणे; आंतरिक विकासाला शैक्षणिक, वैयक्तिक आणि सामाजिक केंद्रस्थानी आणणे; व्यक्तिमत्त्व व चारित्र्य यांतील मूलभूत फरक स्पष्ट करणे; जीवनातील निर्णय, सवयी, नाती आणि नेतृत्व यांमध्ये चारित्र्याचे महत्त्व अधोरेखित करणे; वाचकाला केवळ यशस्वी नव्हे, तर मूल्याधिष्ठित, संतुलित आणि अर्थपूर्ण मानव बनण्याच्या दिशेने प्रवृत्त करणे.
हे पुस्तक वाचकाला एक मूलभूत प्रश्न विचारायला लावते, “मी कसा दिसतो?” यापेक्षा “मी आतून कोण आहे?” कारण अखेरीस, माणसाचा खरा विकास हा त्याच्या पदावर, प्रसिद्धीवर किंवा कौशल्यांवर नव्हे, तर त्याच्या चारित्र्यावर मोजला जातो आणि चारित्र्य हेच आंतरिक विकासाचे सर्वात विश्वासार्ह, शाश्वत आणि सत्य निर्देशक आहे.