Your cart is empty now.
माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाभिमुख राहून समाजस्वास्थ्याच्या अनुषंगाने कार्य करणे हे त्याचे प्राधान्याने कर्तव्य ठरते. बऱ्याचदा एकाकी असणारी माणसे संपूर्ण आयुष्यच व्यक्तिनिष्ठतेमध्ये जगतात. आपण व आपले कुटुंब किंवा जात धर्माच्या पलीकडे पोहोचत नाहीत. अशी घटना समाजस्वास्थ्यास किंबहुना मानवतेस हानिकारक असते. शिक्षणाचा अर्थ नोकरी, पैसा, लग्न, संसार एवढ्यापुरताच सीमित राहत नाही, तर शिक्षण हे संस्कारानुगामी असले पाहिजे. अशाच माणसाला सुशिक्षित म्हणता येईल. अन्यथा शिकलेली माणसेही अडाणीच असतात.
समाजाभिमुख लेखन करणारे हात आणि जिज्ञासेने वाचणारे डोळे यांची एकतानता साधली गेली तर प्रज्ञेच्या प्रकाशाची गावेच्या गावे वसू लागतात.
"अपने लिए जिए तो क्या जिए ए जी तू जी जमाने के लिए !"
हा संस्कारित फॉर्म्युला आहे. शिकलेल्या अडाण्यांना सुशिक्षित बनवण्याचा ! आणि त्याच्या चिंतनाची गरज आहे.
लेखन प्रवाहीपणे सादर करून वाचकांच्या मनाचा ठाव घेणे हे जसे लेखकाचे चांगले एक रूप आहे; तसेच लेखनातून एकांगी विचार न मांडता समतोल मांडणी करणे, साधक बाधक टिपणे नोंदविणे हेदेखील महत्त्वपूर्णच मानले पाहिजे. प्रत्येक माणसाच्या सामर्थ्य व मर्यादा कौशल्यपूर्ण पध्दतीने हाताळणे हे व्यक्ती परिचयाच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरू शकते. अन्यथा लेखनाला निव्वळ स्तुतिपाठकाचे स्वरूप प्राप्त होऊ शकते. स्तुतिपाठकाची भाटगिरी ही वाचकांसमोर दिशासूचन करू शकत नाही. त्यामुळेच सामर्थ्य नोंदविताना मर्यादांचाही सहज उल्लेख हा त्या लेखनाला आणि त्या व्यक्तिमत्त्वाला न्याय देऊन जातो. विविध प्रयोगशील लेखनामधून ही बाब हाताळता येते. श्री. तिवारी त्याबाबतीत कसलेले लेखक जाणवतात.