Your cart is empty now.
ढसाळांच्या राजकीय व सामाजिक भूमिकांविषयी अनेक पद्धतीने बोलने शक्य आहे. परंतु त्यांच्या साहित्याने मराठीला नवे तेज दिले हे मात्र सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे. ढसाळांनी मराठी कवितेला वेगळा आशय, विषय आणि कवितेची वेगळी मांडणी बहाल केली आहे. विषयाच्या, आशयाच्या व शैलीच्या दृष्टीनेही नवेपण निर्माण करून मराठी कवितेत स्वत:चे असे स्थान निश्चित केले आहे. नामदेव ढसाळ हे चिंतनाच्या पातळीवर आपले विषय मुद्देसूद मांडतांना दिसतात. भावनेच्या पातळीवर तेच विषय ते तीव्र करतात तर क्रियात्मकतेच्या पातळीवर त्या सात विषयाला सामान्यपण प्राप्त करून देतात. ही बाब मराठी कवितेध्ये सर्वस्वी नवी आहे. मराठी कवितेच्या ऐतिहासिक टप्प्यामध्ये नामदेव ढसाळांच्या कवितेने वेगळे स्थान निर्माण केले आहे. कवी परंपरेची बिरूदावली लावतांना असे म्हणता येईल की, केशवसुत हे पहिले केशवसुत, मर्ढेकर हे दुसरे केशवसुत, ढसाळ हे तिसरे केशवसुत असे कवितेचे पारंपरिक मूल्यमापन करतांना परंपरेचा तोच तो पणा सांगून त्याचा गौरवाने उल्लेख करणे निराळे. मात्र अशा कुणाच्याही मागे न जाता असे म्हणता येईल की, केशवसुत हे जसे स्वतंत्र केशवसुत, मर्ढेकर जसे स्वतंत्र मर्ढेकर तसे ढसाळ हे स्वतंत्र ढसाळ ठरतात.