Your cart is empty now.
सम्यक ईक्षा ती समीक्षा असे म्हटले जात असले तरी त्यात सम्यक् दृष्टीकोन किती हा प्रश्नच आहे. साहित्याचा प्रांत बहुरंगी असल्याने समीक्षासुध्दा बहुरंगी वा बहुआयामी बनते. समीक्षेच्या क्षेत्रात अनेक पध्दती किंवा संप्रदाय रुढ झालेले आहेत. संतप्रणाली, पंडिती परंपरा, केशवसूत संप्रदाय, मर्ढेकरी किंवा नेमाडपंथी असे शब्दप्रयोग या क्षेत्रात आढळतात. असे संप्रदाय वा अशा परंपरा आजच्या साहित्याला खरोखरच उपयुक्त ठरतील का? व्यक्तिनिष्ठ लेखनाची गती आज वाढत गेल्याचे चित्र दिसते. समीक्षेच्या संदर्भात एक प्रश्न सातत्याने मनात येतो तो असा की, आपल्या समीक्षा विचाराच्या परंपरेत आरंभकाळात संस्कृत साहित्यशास्त्राचा पगडा दिसतो. पण नंतरच्या काळात म्हणजे ब्रिटीश राजवटीत या समीक्षेने नवी वाट चोखळली, त्यामुळे इंग्रजी विचारांचा प्रभाव लक्षात येतो. म्हणजेच मराठी समीक्षा एका बाजूने संस्कृतच्या आधाराने व दुसज्या बाजूने इंग्रजीच्या आधाराने विकसित झाली. मग मराठीला मराठीची समीक्षा आहे का? हा प्रश्न पडतो. ज्याचे नेमके उत्तर देणे अवघड जाते