Your cart is empty now.
स्त्रीवादी साहित्याचा उदय पुरुषप्रधान संस्कृतीच्या कडेलोटातून झाला आहे. त्यामुळे तो मराठी माणसाला आणि मराठी साहित्याला टाळता येणार नाही. उलट स्त्री जाणीव आता मानवकल्याणाकडे झेपावते आहे. आपल्या आग्रही भूमिकेतून सृजन, पोषण, संवर्धन, परस्पर सहकार्य यांचा एक वेगळा दृष्टिकोन मांडते आहे. जर त्याचा अंगिकार आपल्या समाजाने केला तर निश्चितच बदल घडून येईल. कारण हिंसा, द्वेष, आक्रमकता, संकुचित स्वार्थ ह्या विनाशकारी वृत्तीशी स्त्री-शक्ती लढा देते आहे. त्यामुळेच अशावेळी खेड्यापाड्यातील स्त्रियांचे आतून आलेले हुंकार ऐकणे, समजून घेणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, आणि त्यांच्या विधवा स्त्रिया नव्याने संघर्ष करोत लढत आहेत. आपले जगणे सावरण्यासाठी, सुधारण्यासाठी, परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. रुढी व परंपरेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ पाहत आहेत. खचून न जाता कुटुंब व समाजाने लादलेल्या क्लेशदायक अनिष्ट सांस्कृतिक बेड्या तोडू पाहत आहेत. अशा स्त्रियांचा शोध घेऊन त्यांच्या जीवनगाथा समाजापुढे आपणण्याचे नवे आव्हान स्त्रीवादी साहित्यापुढे आहे. डॉ. मारोती कोल्हे यांनी स्त्रीवादी कवितेवरील केलेल्या संपादनाने या नव्या साहित्य प्रवाहास पुष्टी प्रदान केली आहे. हे स्तुत्य आहे.
– प्राचार्य डॉ. प्रतिमा इंगोले, दर्यापूर जि. अमरावती