Your cart is empty now.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत संरक्षण व सामरिक शास्त्र विषयाचा छएझ 2020 नुसार अभ्यासक्रम तयार करण्यात आला. अभ्यासक्रमा अंतर्गत ‘संरक्षण व सामरिक शास्त्रात डिजिटलायझेशन चा उपयोग’ या पुस्तकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीमुळे आधुनिक जगात अनेक क्षेत्रांमध्ये घडलेले बदल नमूद केले आहेत. युद्धपद्धती आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या संकल्पनांमध्येही या बदलांचा स्पष्टपणे परिणाम दिसून येतो. पारंपरिक युद्धाबरोबरच आता सायबर अवकाश, डिजिटल तंत्रज्ञान आणि माहिती प्रणाली या नव्या घटकांनी युद्धाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे केले आहे.
आजच्या काळात सायबर सुरक्षा ही केवळ तांत्रिक बाब नसून ती राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे. माहितीचे संरक्षण, डिजिटल नेटवर्कची सुरक्षितता आणि तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर यांवर राष्ट्रांची क्षमता आणि सुरक्षितता मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे.
या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा आणि डिजिटल युद्धपद्धती या विषयांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. या विषयातील मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
या पुस्तकात सायबर युद्धपद्धतीचा उदय, त्याचे राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणाम, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा लष्करी कार्यवाहीमध्ये होणारा वापर यांचा सुसंगत आढावा मांडण्यात आला आहे. ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्रणाली आणि युद्धनियोजनातील तांत्रिक साधनांचा उपयोग यांचाही विचार येथे समाविष्ट केला आहे. या पुस्तकाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून वाचकांना आधुनिक युद्धपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या स्वरूपाबद्दल जागरूक करणे हा आहे. विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा आहे. वाचकांनी या पुस्तकाचे स्वागत करून त्यातील विचारांचा अभ्यास करावा.