Your cart is empty now.
गृहअर्थशास्त्र हा कला शाखेतील ऐच्छिक विषय अनेक वर्षापासून शिकवल्या जात आहे. गृहअर्थशास्त्र हा विषय आज केवळ अभ्यास विषय न राहता तो गृहिणीकरिता एक जीवनोपयोगी विषय ठरत आहे. कारण गृहअर्थशास्त्र हा विषय आहार, कुटुंब, गृहव्यवस्थापन, आरोग्य, वस्त्र, ग्राहक उपभोक्ता अर्थशास्त्र, विस्तार शिक्षण, मानव विकास अशा विविध शाखांनी परिपूर्ण विषय असल्याकारणाने हा विषय आजच्या विद्यार्थिनी व उद्याच्या गृहिणीकरिता जीवनाला परिपूर्ण बनवणारा विषय ठरणार आहे. अन्न हे मानवी जीवनाशी संबंधित अमूल्य घटक आहे. अन्न नसेल तर मानव जीवन जगू शकत नाही. म्हणून अन्न, पोषण, अन्न घटकाचे पोषणमूल्य याचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपण खाल्लेल्या अन्नाचा शरीर कसा उपयोग करते. अन्नाचे पोषण, पचन कसे होते? कोणत्या आजारात कोणत्या प्रकारचा आहार घ्यायचा, कोणता आहार टाळायचा याची माहिती आपल्याला या शास्त्राद्वारे प्राप्त होते. भारतीय बाजारपेठ विक्रेत्याची आहे. त्यामुळे उपभोक्त्याची पिळवणूक होते. अन्नभेसळ ही फार मोठी समस्या आहे, ती कशी ओळखावी, अन्नभेसळ असल्यास त्यावर काय उपाय योजना करावी. अन्न भेसळीचा प्रतिबंध कशाप्रकारे करता येईल याबद्दलची माहिती व उपायाचे वर्णन या शास्त्रात केलेले आहे. आजच्या विद्यार्थिनी ह्या उद्याच्या भावी नागरिक असल्याने सशक्त आहार सशक्त जनता घडवण्यास हे शास्त्र एक वैज्ञानिक शास्त्र ठरणार आहे.
प्रस्तुत पुस्तकात अन्न पोषणाचा परिचय, अन्नाचा अर्थ, अन्नाचे कार्य, पोषण शिक्षणाचे महत्त्व, त्याच्या पद्धती, कर्बोदके, तृणधान्य, स्निग्ध, प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, पालेभाज्या, पाणी या सर्वांचे प्रकार, त्यांची पोषणमूल्य, त्यांचे महत्त्व त्याचे स्रोत या सर्वांची सविस्तर माहिती या पुस्तकात आहे. त्याचबरोबर समतोल आहार, समतोल आहाराची तत्त्वे, बाल्यावस्था, किशोरावस्था, गर्भवती महिला, दुग्ध सर्जन करणाऱ्या माता यांना कशा प्रकारचा समतोल आहार द्यावा. त्याचबरोबर विविध रोगांमध्ये दिल्या जाणाऱ्या आहाराच्या तालिका, अन्न शिजवण्याच्या पद्धती, अन्नाची पोषणमूल्य वाढवण्याच्या पद्धती, अन्नसंरक्षण, अन्न बिघाड, अन्न भेसळ या सर्वांची माहिती प्रस्तुत पुस्तकात असल्याकारणाने प्रस्तुत पुस्तक हे सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापक तसेच गृहिणींना एक मार्गदर्शिका ठरणार आहे