Your cart is empty now.
व्यक्तीला बाह्यरुपाने आकर्षक बनविणार्या गोष्टींनी व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ठरत नाही. व्यक्तिमत्त्व हे व्यक्तीच्या कोणत्याही एका शारीरिक, मानसिक गुणधर्मात सामावलेले नसून ते संघात स्वरूपी आहे. या संघात स्वरूपी घटकांमध्ये केवळ सुसंगतपणे व सातत्याने दिसून येणार्या शारीरिक-मानसिक-सामाजिक गुणधर्मांचा समावेश होतो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व ज्या गुणधर्मावरून स्पष्ट होते त्या गुणधर्माचा आविष्कार सामाजिक वर्तनामध्ये दिसून येत असल्यामुळे व्यक्तिमत्त्व या कल्पनेस सामाजिक संदर्भ प्राप्त झाला. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा इतर व्यक्तींवर प्रभाव पडतो. हा प्रभाव वर्तन विशेषातून पडतो. वर्तनाच्या मुळाशी मानसिक कल, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता इ. गोष्टी असतात. म्हणून व्यक्तिमत्त्व हे या सर्वांचा संघात होय. व्यक्तीला व्यक्तित्व असून व्यक्तिमत्त्व देखील असते. व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व यात मूलतः फरक आहे. व्यक्तिमत्त्व सतत बदलत असते. कारण जीवनातील अनुभवांची भर त्यात सारखी पडते. व्यक्तिमत्त्व रचना व व्यक्तिमत्त्व विकास यांचा विचार पाश्चात्य आणि पौर्वात्य संशोधकांनी, तत्ववेत्यांनी केला आहे.
प्रस्तुत पुस्तकात व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व कौशल्य, सादरीकरण कौशल्य, श्रवण कौशल्य, संभाषण कौशल्य, सुदृढ/सक्षम वैशिष्ट्यांसह व्यक्तिमत्त्व, समाज आणि मानवी संबंध, वैयक्तीक व सार्वजनिक क्षेत्रातील संघर्ष व ताणतणावाचे व्यवस्थापन, सामाजिक सलोखा, भावनिक बुद्धीमत्ता, व्यवसाय नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, मुलाखती, व्यक्तीमत्व आणि अभियोग्यता कसोट्या इ. विविधांगी मुद्द्यांचा सर्वांगीण परामर्श घेतला आहे.
Vyaktimatav Vikas