Your cart is empty now.
इतिहास हा विषय सर्वसामान्यांच्या दृष्टीने मनोरंजक, गोष्टीरूप व आनंददायी आहे. म्हणूनच तो लहानांपासून थोरांना आवडणारा विषय आहे. प्राचीन भारताच्या इतिहास अध्ययनातून आपल्याला भारतीय संस्कृतीची जडणघडण कशी झाली, याची माहिती प्राप्त होते. प्राचीन काळी या भूमीस ‘भारतवर्ष’ असे म्हटले गेले. प्राचीन भारताच्या इतिहासाची सुरुवात अश्मयुगापासून झाली. ताम्रपाषाण युगाच्या अखेरच्या काळात हडप्पा संस्कृतीचा उदय झाला. प्राचीन भारताची सांस्कृतिक दृष्टीने जडणघडण होण्यास प्रामुख्याने आर्यांच्या काळात सुरुवात झाली. राजकीय दृष्टीकोनातून टोळ्यांचा काळ संपून विभाजित लोकसमूह एकत्र येण्याला या काळात सुरुवात झाली. याच कालखंडात प्राचीन भारताच्या सांस्कृतिक जीवनास चालना प्राप्त झाली. भगवान गौतम बुद्ध व वर्धमान महावीर यांनी अनुक्रमे बौद्ध व जैन धर्माची स्थापना केली. याच काळात बलाढ्य अशा मगध साम्राज्याचा उदय, अलेक्झांडरची स्वारी या महत्वपूर्ण घटना घडल्या. मौर्य युगापासून प्राचीन भारताच्या राजकीय इतिहासास सुरुवात झाली. मौर्य, कुशाण, सातवाहन, गुप्त, वाकाटक, हर्षवर्धन तर दक्षिणेत चालुक्य, पल्लव, राष्ट्रकुट, चोल इत्यादी कर्तबगार अशी राजघराणी प्राचीन भारतात होऊन गेली. भारतात वेळोवेळी आलेल्या ग्रीक, शक, पहलव, हूण इ. परकीय सत्तांनी भारतीय समाजव्यवस्था, कला, वास्तुशास्त्र, साहित्य यांच्या विकासात मोठी भर घातली. वैदिक, बौध्द, जैन, द्रविड यांच्या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून संयुक्त स्वरुपाची भारतीय संस्कृती उदयाला आली. म्हणून भारताच्या प्रारंभिक इतिहासाचे महत्व अनन्यसाधारण आहे.