Your cart is empty now.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एफ.वाय.बी.कॉम. या वर्गाच्या द्वितीय
सत्राच्या अभ्यासक्रमानुसार लिहिलेले बँक व्यवसायाची मूलतत्त्वे (Fundamentals
of Banking) हे पुस्तक विद्यार्थी आणि वाचकांच्या हातात देतांना आम्हास अत्यानंद
होत आहे. खरे तर वाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्र या विद्याशाखेत बँकींग हा
एक अत्यंत गतिमान अभ्यास विषय आहे. त्याच्या अध्ययनातून ज्ञानाच्या कक्षा
निश्चितच विस्तारता येतात. मानवी जीवनातील या विषयाचे महत्व अनन्यसाधारण
आहे. कारण बँकींग व्यवहारांचा आपल्या दैनंदिन जीवनाशी जवळचा संबंध आहे.
सहाजिकच व्यवहार आणि त्यातील तंत्रज्ञानाची आपल्याला किमान तोंडओळख
असावी अशी अपेक्षा अभ्यासक्रम रचनाकारांची असते. F.Y.B.Com या वर्गाच्या
बदललेल्या CBCS पॅटर्ननुसारच्या मूलभूत बँकींग या ऐच्छीक पेपरची अभ्यास
रचना करतांना वाणिज्य व बँकींग अभ्यास मंडळाने खूप व्यापक आणि डोळस
दृष्टीकोन समोर ठेवून अभ्यासक्रम रचना केलेली आहे. त्यात बँकांच्या गुंतवणुकीची
म्हणजेच कर्जे देण्याची तत्वे, बँकांचा ताळेबंद, चलनक्षम दस्तऐवज व त्यांचे
पृष्ठांकन या मूलतत्त्वांबरोबरच आधुनिक बँका ज्या प्रगत तंत्रज्ञानाचा व्यवहारासाठी
वापर करीत आहे. त्यांचा समावेश करून एक उपयुक्त आणि गतीमान अभ्यासक्रम
तयार केला आहे. या अभ्यासक्रमामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना एक नवी दिशा
मिळेल.
F.Y.B.Com या वर्गाच्या Fundamentals of Banking या विषयाच्या
द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमानुसार मूलभूत बँकींग हे पुस्तक लिहितांना संपूर्ण
अभ्यासक्रमाची मुद्देसूद मांडणी केलेली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या संदर्भग्रंथांचा
आणि इंटरनेटचा योग्य तो वापर केलेला आहे.