Your cart is empty now.
या विषयाच्या प्रथम सत्रामध्ये उपयोजित मराठी तर द्वितीय सत्रामध्ये व्यावहरिक मराठी या अभ्यासक्रमांचा समावेश केलेला आहे. मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये व्यावहारिक मराठीचे स्वरूप व्याप्ती, आवश्यकता व त्याचे महत्त्व तसेच निबंधलेखन, त्याचे स्वरूप, व्याप्ती, निबंधलेखनाचे विविध प्रकार हा घटक क्रमांक एक निहीत केलेला आहे. तर घटक क्रमांक दोनमध्ये अर्ज लेखन आणि पत्रलेखन या दोन संयुक्त घटकांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये त्यांचे स्वरूप, त्यांचे विविध प्रकार, त्याची आवश्यकता आणि त्याचे व्यावहरिक मराठीच्या अभ्यासक्रमात असणारे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. या सर्व घटकांचा यथासांग आढावा घेण्याचा प्रयत्न सदर संदर्भ पुस्तकात केलेला आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ समीक्षकांची आणि अभ्यासकांची मते विचारात घेऊन व्यावहरिक मराठीचे स्वरूप आणि त्याची आवश्यकता नमूद केलेली आहे. आज प्रत्येक व्यक्तीला केवळ पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेऊन चालणार नाही तर त्याबरोबरच त्याच्याकडे विविध कौशल्य असणे आवश्यक आहे. कारण दैनंदिन जीवनात आपल्या नोकरीच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, उद्योगधंद्याच्या ठिकाणी व्यक्तीला अनेक कौशल्यांची गरज भासते. जसे की, कार्यक्रम संयोजन, निवेदन, सूत्रसंचालन, भाषण, या भाषिक कौशल्यांबरोबरच मुद्रित शोधन, टंकलेखन, दुभाषी इत्यादी. प्रशासनिक क्षेत्रामध्ये देखील विविध प्रकारच्या व्यावहरिक मराठीच्या कौशल्यांची आवश्यकता असते. आजचा विद्यार्थी जर उच्चविद्याविभूषित असल्याबरोबरच कौशल्यप्रवण असेल तर त्याला कोणत्याही शिक्षणसंस्थांचे, संस्थापकांचे, उद्योजकांचे किंवा विविध कंपन्यांचे उंबरे झिजवण्याची गरज नाही. स्वतः आत्मसात केलेल्या कौशल्याच्या बळावर स्वतःचे स्वतंत्र असे व्यवसाय तो उभे करू शकतो आणि त्या माध्यमातूनच स्वतः स्वतःला रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याबरोबरच इतरांना देखील अशा अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. हे केवळ व्यावहरिक मराठीतील विविध कौशल्य हस्तगत केल्यामुळेच शक्य होणार आहे. अर्थात हा विचार करूनच पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळातील सर्व सन्माननीय सदस्यांनी प्रस्तुत विषयाची निवड केलेली आहे ती सार्थ वाटते.