Your cart is empty now.
“भूस्थल दर्शक नकाशावाचन आणि हवामान दर्शक नकाशे व उपग्रह प्रतिमा” हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या तृतीय वर्ष कला प्रात्यक्षिक भूगोल सत्र तीन व चार अभ्यासक्रमानुसार तयार करण्यात आले आहे. या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना भूस्थल दर्शक नकाशांचे वाचन, नकाशातील विविध चिन्हे व संकेतांक, अक्षांश-रेखांश, उंची, उतार, नदी प्रणाली, वस्ती, वाहतूक व्यवस्था आणि भूरूपांचे विश्लेषण यांचे सुलभ व शास्त्रीय पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर हवामान दर्शक नकाशांमधून तापमान, वायुदाब, वारे, पर्जन्य, ढगांची स्थिती आणि हवामान प्रणाली यांचा अभ्यास कसा करावा, याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पुस्तकात आवश्यक त्या ठिकाणी सुलभ आकृत्या, नकाशे, सांकेतिक चिन्हे व खुणा, उपग्रह प्रतिमा दिलेल्या आहेत.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात दूरसंवेदन व उपग्रह तंत्रज्ञानाने भूगोलाच्या अभ्यासाला नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे. त्यामुळे उपग्रह प्रतिमांचे स्वरूप, प्रकार, प्रतिमा वाचनाची मूलतत्त्वे, प्रतिमा अर्थनिर्णयनाचे घटक आणि हवामान निरीक्षणासाठी वापरले जाणारे उपग्रह यांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. कल्पना-1, INSAT-3D, INSAT-3DR आणि INSAT-3DS यांसारख्या भारतीय हवामान उपग्रहांची माहिती विद्यार्थ्यांना आधुनिक हवामान निरीक्षणाची वाटचाल समजून घेण्यास उपयुक्त ठरेल.
हे पुस्तक विशेषतः पदवी स्तरावरील विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तयार करण्यात आले असून, विषयातील संकल्पना सोप्या, सुबोध आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नकाशे व उपग्रह प्रतिमांचे केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता त्यांचे निरीक्षण, विश्लेषण, अर्थनिर्णयन आणि व्यावहारिक उपयोग समजावून देणे हा या पुस्तकाचा प्रमुख हेतू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (2020) च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, विश्लेषणात्मक विचार, अवकाशीय आकलन आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित होण्यास हे पुस्तक उपयुक्त ठरेल,