Your cart is empty now.
पुस्तकाचा पहिला भाग "स्व-मानसशास्त्र" या विषयावर केंद्रित आहे. यात स्व-संकल्पना, तिची निर्मिती आणि तिच्यावर परिणाम करणारे विविध घटक या विषयांचा सखोल विचार केला आहे. "स्व"चे विविध प्रकार- वास्तव-स्व, आदर्श-स्व, सामाजिक-स्व, आध्यात्मिक-स्व - यांच्या माध्यमातून वाचक स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घेऊ शकतो. तसेच, SWOC विश्लेषण आणि जोहारी विंडो (Johari Window) यांसारख्या विश्लेषण साधनांद्वारे स्वतःकडे पाहण्याची आणि स्वतःचे मूल्यांकन करण्याची संधी दिली आहे.
तसेच यात स्व-जागरूकता, स्व-प्रतिमा, स्व-नियमन, स्व-सादरीकरण, स्व-आदर आणि स्व-सामर्थ्य या घटकांच्या माध्यमातून व्यक्ती कशा प्रकारे स्वतःचा विकास साधू शकते, हे स्पष्ट केले आहे. आत्मशिस्त, आत्मपुष्टीकरण आणि आत्मविशेषता यांचा समतोल साधत, व्यक्ती अधिक आत्मविश्वासापूर्ण आणि संतुलित जीवन जगू शकते, हा संदेश या विभागातून दिला आहे.
दुसरा भाग "भावना व्यवस्थापन" या विषयावर आहे. भावना ओळखणे, त्यांचे नियमन करणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे भावनिक बुद्धिमत्तेचे मुख्य घटक आहेत. या भागात भावना, तणाव, चिंता आणि नकारात्मक भावनांचे व्यवस्थापन या विषयांचा व्यावहारिक दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. विश्रांती, व्यायाम, वेळ व्यवस्थापन आणि स्व-स्वीकृती यांसारखी तंत्रे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यास आणि मनोबल वाढीस सहाय्यक ठरतात.
या पुस्तकाची रचना करताना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांबरोबरच त्यांच्या भावनिक आणि मानसिक विकासाचाही विचार करण्यात आला आहे.