निवडक अभंग - ज्ञानेश्वर ते तुकाराम
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
अभंग आणि ओवी या लोकाविष्काराचे माध्यम स्वीकारून संतकवींनी आपले अनुभव शब्दांकित केले. संतांचे साहित्य अध्यात्मपर, परमार्थपर असले तरी ते ज्या वास्तव जीवनातून बहरले, फुलले त्या वास्तव जीवनाचे रूप, रंग आणि गंध त्याला सहजच लाभले. सामाजिक वास्तवाचे भान त्यातूनच प्रकटले. विठ्ठलभक्तीबरोबरच दु:खमुक्ती आणि ऐहिक जीवनातील ताण-तणाव, संघर्ष यांचे चित्र त्यातून साकार झाले. यादव काळात महानुभाव आणि वारकरी असे दोन संप्रदाय उदयाला आले. वारकरी संप्रदाय अधिक खोलवर रुजला. संतवाङ्मयाच्या मागे वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान होते. पंथीय प्रेरणा असूनही हे वाङ्मय केवळ प्रचारकी बनले नाही. ही चळवळ वाङ्मयीन बनली, जीवनस्पर्शी बनली. चळवळीचे साहित्य म्हणून त्याकडे पाहता येते. सभोवतालचे वास्तव, मध्ययुगीन गतिरुद्धता आणि भक्तीच्या निमित्ताने व्यक्तिस्वातंत्र्याचा केलेला पुकारा या सर्वांचा वाङ्मय निर्मितीवर काय परिणाम झाला हे तपासणे आज गरजेचे आहे. संत साहित्य केवळ अध्यात्मपर आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संतांच्या अभंगातील आकृतीसौंदर्य, रचना विशेष, गेयगुण यांच्या बरोबरच त्यातील आशयसंपन्नता, परिवर्तनवादी विचारशक्ती यांचाही परामर्ष घेणे मला आवश्यक वाटते.
मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा अभ्यास आज दुर्लक्षित होत आहे. वारकरीपंथीय तत्त्वज्ञानातील परिवर्तनवादी विचार व संतसाहित्य यांचा परस्पर संबंध समजून घेतल्यास चळवळीतून साहित्यसृजन कसे होते व ते त्या चळवळीला व परंपरेला बळ देत देत पुढील साहित्य निर्मितीस कसे प्रेरक ठरू शकते, याचाही हिशेब मांडणे आजच्या संदर्भात शक्य होईल. विशिष्ट कालखंडाचा साहित्यावर प्रभाव व त्या साहित्यातून निर्माण झालेल्या विचारांचा कालखंडावर परिणाम असे परस्पर संबंधाचे स्वरूपही यातून पाहता येईल. साहित्य आणि समाजजीवन यांचे नाते तपासणे व साहित्य निर्मितीमागील प्रेरक शक्ती समजावून घेणे एवढे जरी भान या निमित्ताने आले तरी पुरेसे आहे. अभ्यासक, विद्यार्थी, रसिक या प्रयत्नाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.
Nivadak Abhang – Dnyaneshwar Te Tukaram
Related products
-
सकारात्मक मानसशास्त्र
₹195.00 -
सासर माहेर
₹95.00