तावडी माटी
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
‘तावडी माटी’तल्या कविता या प्रेम, पत्निप्रेम, मातृत्व, निसर्गाची विविध रूपे, धर्म-अध्यात्म-प्रबोधन, सद्यकालीन राजकारण व सामाजिक परिवर्तने तसेच संकीर्ण अशा विविधतेने नटलेली आहे. प्रेमकवितेतील नायिकेच्या धीटपणाचा अनुबंध हालाच्या ‘गाथा सत्तसई’तील नायिकांशी जाणवतो तसा आदिबंधाशीही वाटतो. सृजनशील अनिमा विविध रूपात अविष्कृत होत विभ्रमातून अविष्कृत होत अनिमसला निर्मितीला प्रेरणा देण्यास भुलवत मातृत्वाचे सुख भोगते. यातील निसर्गप्रतिमांचे सौंदर्य अपूर्व आहे. स्त्रियांच्या अनेक रूपांचे दर्शन या कवितेतून होते. निसर्गाच्या विविध रूपांचे परिणामकारक चित्रण, माणुसकी हाच धर्म आणि त्याचे आचरण करणारा तोच खरा संत, बाकी स्वतःचे स्तोम माजवून शोषण करणारे अध्यात्माच्या टपर्या चालविणारे स्वघोषित परमपूज्य हे दांभिक असून त्यापासून सावध राहण्याचे कवीने केलेले आवाहन, राजकारणामुळे भावाभावात पडलेली फूट व बायकोच राजकारणी नवर्याच्या महत्त्वाकांक्षेचं झालेलं साधन, भ्रष्टाचार, बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक-सामाजिक प्रश्न आणि आत्महत्या न करण्याचे आवाहन अशी अनेक परिमाणे या कवितेत आहेत.
कवीची भावात्मक समाजाभिमुखता, आशावाद, तावडी माटीविषयीचा अभिमान सर्वत्र अविष्कृत होतो. हा अविष्कार संतसाहित्य व लोकसाहित्याने अंगिकारलेल्या अष्टाक्षरी ओवीतून केला आहे. या माटीची देशीयता आणि कवीची आत्मनिष्ठा ही जीवनमूल्येच या कवितेची वाङ्मयमूल्ये होत. साहित्य अकादमीने ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या प्रकल्पांतर्गत प्रकाशित केलेल्या ‘बहिणाबाई चौधरी’ या पुस्तकाचे लेखक, भाषाविज्ञान व व्याकरण यावर विशेष प्रभुत्व असलेले कवी प्रकाश सपकाळे यांनी या कविता खानदेशी तावडी बोलीत केल्या आहेत. या बोलीची ओळख त्यांच्या बहिणाईची गाणीची निर्मितिप्रक्रिया संवेदनशीलतेने उलगणार्या ‘खोप्यामधी खोपा’ या कादंबरीतून तसेच ‘बहिणाईची गाणी’मधून रसिक वाचकांना झालेली आहे. तावडी बोलीचे सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा प्रत्यय या कवितासंग्रहातून येतो.
– प्राचार्य डॉ. रा. गो. चवरे
Tavdi Mati