रंगराव पाटील
असं म्हणतात की, जिंकण्याची इच्छा असणं आणि जिंकण्याच्या इच्छेसाठी पूर्वतयारी करणं यात खूप फरक आहे. समजा एखाद्या व्यावसायिकाला आपला व्यवसाय वाढवायचा आहे, त्याचा विकास करायचाय तर त्याला त्यासाठी खास प्रयत्न, तेही नियोजनबध्द करावे लागतात. अर्थात त्याप्रसंगी त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात. पण त्या व्यावसायिकाला \’ते\’ पर्याय एकाच वेळी वापरता येत नाहीत. तो असा पर्याय निवडतो जो त्याला सहजी मानवेल व त्याचा व्यवसायही वाढवून देण्यास मदत करील. थोडक्यात, तो \’धोका\’ नसलेला पण \’फायदा\’ देणारा पर्याय निवडतो. \’रुक जाना नही, तू कही हार के\’ म्हणत व्यवसायाला पुढे नेतो.
जळगावच्या \’प्रशांत बुक हाऊस\’ व \’प्रशांत पब्लिकेशन्स्\’ चे मालक रंगराव पाटलांना जेव्हा भेटायला निघालो तेव्हा वरील विचार डोक्यात होते. पण प्रत्यक्षात काय – काय घडले व रंगराव कसे घडले, हे जाणण्याची देखील उत्सुकता होती. म्हणून मुलाखतीच्या सुरुवातीला \’नमस्कार\’ वगैरे करत मी सरळ सुरुवात केली ती खालील प्रश्नाने…
प्रश्न : कोल्हापूर ते जळगाव आणि सेल्समन ते \’प्रशांत\’ चे मालक. हा प्रवास कसा होता वा या प्रवासातील \’घडवणारे\’ टप्पे कसे होते!
रंगराव : कीर्ती आणि विश्रांती या गोष्टी कधीच एकत्र नांदत नाही. माझ्या बाबतीत सागायचं तर \’थोडाही गुण मिळता घ्यावा / साठा त्याचा नित्य करावा / कोणालाही तो शिकवावा / ठेवा हे चित्ती\’ या न्यायानुसार या पुस्तक व्यवसायात मी गेल्या 25-26 वर्षांपासून आहे. सुरुवातीला 4/5 वर्षं मी आग्रा येथील \’रतन प्रकाशन\’ मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करत होतो. त्यानिमित्ताने उत्तर प्रदेशात फिरत होतो. अगदी डाकूंच्या टोळ्या अनुभवत गावं फिरत होतो. प्रसंगी त्याच डाकूंच्या गाडीत वगैरे बसत एखादं गाव संध्याकाळच्या वेळी पार करत होती. म्हणूनच ही फिरस्ती तशी खडतर. त्यात मी मराठी भाषिक, महाराष्ट्रातला. साहजिकच इतर भाषिक मला थोडे वेगळं ठरवायचे. पण मी जिद्दीने काम करत होतो. अशाच फिरस्तीत पुढे नागपूरच्या \’हिमालय\’ संस्थेशी माझा परिचय झाला. मी उत्तर प्रदेशाला रामराम करत महाराष्ट्रात आलो. पुढे \’हिमालय पब्लिकेशन्स\’ चा प्रतिनिधी म्हणून मी जवळपास दहा-अकरा वर्ष काम केलं. विदर्भासह, खान्देश, मराठवाडा हा भाग हिंडलो, फिरलो. तिथली सर्व कॉलेजं पालथी घातली. त्याबरोबरच त्या भागाचा मी डोळसपणे अभ्यास करतं स्वत:चं दुकान शोधू लागलो आणि 1995 ला ते जळगावी मला सापडलं.
प्रश्न – \’धैर्याला काहीच पर्याय असत नाही\’ या वाक्याचा आधार घेत पुढचा प्रश्न असाय की, 1995 ला तुम्ही जळगावी आला आणि \’प्रशांत बुक हाऊस\’ ची पाटी लावत खर्या अर्थाने मालक झाला. पण हा \’प्रवास\’ तसा सोपा होता वा लगेच यशाचा मार्ग दाखवणारा होता?
रंगराव : धैर्याला काही पर्याय असत नाही… ह्याच ओळीचा आधार घेत सांगायचं तर \’जोखीम पत्करणं व निभावणं या दोन गोष्टी मी तशा अगोदरच शिकलो होतो. 1995 ला जेव्हा जळगावी मी \’प्रशान्त बुक हाऊस\’ चा पसारा मांडला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की, खान्देश परिसरातील सर्व छोट्या मोठ्या गावांना वा त्या परिसरातील सर्व महाविद्यालयांना जर आपण अभ्यासासंबंधी, संदर्भासह पुस्तकं दिली, पोहचवली तर ती त्यांना हवीये. झालं, मी तिच नस पकडत \’प्रशांत\’ ची दिशा ठरवली. ऑर्डरी मिळू लागल्या आणि थोडाथोडा जम बसू लागला. अर्थात जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना भेटणं व त्यांना हवी ती पुस्तकं (प्रतिनिधीद्वारा) देणं तसं सोपं नव्हतं. पण ती जोखीम मी पत्करली, पुढे जात राहिलो.
प्रश्न : 1995 नंतर वर्ष आलं 2002. त्याच 2002 साली \’प्रशांत\’ ने आपली ‘पब्लिकेशन्स्’ ही ब्रॅन्च सुरु केली. नेमकी काय भावना होती या पब्लिकेशन्स सुरु करण्यामागे!
रंगराव : महाविद्यालयांना पुस्तकं पुरवता पुरवता माझ्या असं लक्षात आलं की, विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांवर आधारित पुस्तकं छापायला जर आपण हाती घेतली तर ते गणित सुटतेय वा जमतेय. म्हणून 2002 ला मी \’प्रशांत पब्लिकेशन्स\’ ची सुरुवात केली. पण प्रश्न होता अभ्यासक्रमानुसार पुस्तकं लिहून देणार्या लेखकांचा? मी बर्याच प्राध्यापक मित्रांना लिहिण्याविषयी विचारलं. रॉयल्टीनुसार पैसे देऊन केले. हळूहळू टीम तयार होत गेली. त्यात पुण्याच्या \’अमोल प्रकाशन\’ चे संजय काकडे यांच्यासह खूपशा माणसांचं उत्तम सहकार्य लाभलं. एफ.वाय. ते एम.ए. पर्यंतची (वा तिन्ही शाखांची) पुस्तकं प्रकाशित होऊ लागली. वाचकांनी, विद्यार्थ्यांनी \’प्रशांत\’ टीमची पुस्तकं स्वीकारली आणि आज प्रकाशित पुस्तकांची संख्या शंभरी ओलांडत पुढे गेली आहे. त्यानंतर कथा – कादंबर्यांऐवजी मी काही संदर्भ वा ललित पुस्तकं प्रकाशित केली.
प्रश्न : \’प्रशांत\’ चा दोन्ही अंगानं पसारा वाढला. आता तर तो सारा पसारा नव्या वास्तूत स्थिरावतोय. यापुढे काही नव्या योजना हाती घेणार आहात?
रंगराव : पुस्तकांच्या रुपाने वाचकांशी संवाद साधण्याचं व विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांना विविध विषयांवरची पुस्तकं देण्याचा सिलसिला यापुढेही सुरु राहणार आहेच. काळानुसार ऑनलाईन सर्व्हिस देणं जसं गरजेचं आहे तसंच व्यक्तिमत्त्व विकास व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशी पुस्तकं, संदर्भग्रंथ कमी किंमतीत उपलब्ध करुन द्यायचीय. संदर्भ ग्रंथांचं दालनही वाढवायचं आहे. महाविद्यालयांमध्ये जे स्पर्धा परीक्षा विभाग आहेत त्यांना उत्तमोत्तम व लेटेस्ट पुस्तकं देण्याची तयारी सुरु आहे. तसेच विद्यापीठाची क्रमिक पुस्तकं, त्याच्या कॉपीज् जास्त छापल्या जात असल्याने, कमी किमतीत आम्ही देणार आहोत. नव्या दमाच्या लेखकांमार्फत नव्या विषयांची ओळख विद्यार्थ्यांपर्यंत नेण्याचा आम्ही 100% प्रयन्त करणार आहोत आणि मला वाटतं आम्ही ह्याच ग्रंथ प्रसारासाठी जे न्यूज बुक वा न्यूज बुकलेट तयार करत महाविद्यालयांपर्यंत पोहचवतोय, त्याचाही चांगला फायदा आम्हाला होतोय.
असो. तर, \’अकॅडेमिक बुक हाऊस\’ ही नवी वितरण व्यवस्था हाती घेत आज \’प्रशांत\’ चे रंगराव पाटील व त्यांची टीम ज्यारितीने सजग, सुजाण वाचकांसाठी व अभ्यासूंसाठी नव्या योजना आखत आपलं कार्य समाजाभिमुख वा ज्ञानाभिमुख करताय ती खरोखरच कौतुकास्पद गोष्ट आहे.
\’प्रशांत\’ ला आपल्या सर्वांचं उत्तम सहकार्य आहेत, ते वाढावे ही आग्रहाची विनंती!
शब्दांकन : चंद्रकांत भंडारी, जळगाव