रौप्य महोत्सवी प्रगतिपथावरील वाटचाल!

वाचन संस्कृतीचे आधारस्तंभ म्हणजे वाचक, लेखक, प्रकाशक, ग्रंथ वितरक आणि ग्रंथालये असतात. वाचक-लेखक, प्रकाशक आणि ग्रंथालयांना नित्यनूतन ग्रंथांची उपलब्धता ‘ग्रंथवितरक’ सातत्याने करीत असतात. त्यामुळेच वाचकांच्या गरजा पूर्ण होऊन ‘वाचन संस्कृती’ समृध्द होत असते. आज प्रकाशन संस्थेलाच वितरणाची जोड घेऊन वाचकांपर्यंत पोहचावे लागते अशी स्थिती आहे. त्यामुळे “प्रशांत पब्लिकेशन्स आणि बुक हाऊस” या संस्थेमार्फत जळगावमध्ये गेल्या 15 वर्षात जी अविरत आणि उत्कृष्ट सेवा देण्याची परंपरा निर्माण केली आहे; ती खानदेशात सध्यातरी अग्रस्थानी आहे असे जाणवते. त्याचे सेवावृत्तीचे आणि व्यावसायिक सूचितेचे कार्य श्री.रंगराव पाटील यांनी परिश्रमपूर्वक सुरु ठेवले आहे. ‘प्रशांत पब्लिकेशन्स’ आणि ‘बुक हाऊस’ हा आता या ग्रंथ संस्कृतीचा आणि वाचन अभिरुचीचा फार मोठा परिवार म्हणून शैक्षणिक आणि सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात सर्वश्रृत झाला आहे.

श्री. रंगराव पाटील यांच्या आयुष्याच्या प्रगती पथाचा आलेख हा खडतर मार्गाचा असून कोल्हापूर ते आग्रा आणि व्हाया नागपूर ते जळगाव – खानदेश असा सुमारे 25 वर्षांचा दीर्घ प्रवास आहे. आग्राचे रतन प्रकाशन आणि नागपूरचे हिमालया पब्लिकेशन्स या दोन्ही ठिकाणी सुमारे दहा-अकरा वर्षे खूप मेहनत त्यांनी घेतली. एक प्रकारचे व्यावसायिक प्रशिक्षणच म्हणता येईल अशी त्यांची स्थिती होती. विदर्भ-मराठवाडा आणि खानदेशातील सर्व शिक्षण संस्था, प्राचार्य, वाचनालये, प्राध्यापक आणि वाचक-विद्यार्थी यांचे अनुभवनिष्ठ सर्वेक्षण या नोकरीच्या (प्रतिनिधी) काळात त्यांनी केले. ही अनुभवांची ‘शिदोरी’ घेऊन त्यांनी प्रशांत पब्लिकेशन्स आणि प्रशांत बुक हाऊस या व्यवसायात पदार्पण केले. मराठी तरुण सहसा नोकरी आणि मर्यादीत उत्पन्नावर खूष असतो. रंगराव पाटील यांनी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश आणि नागपूर-विदर्भात जे वितरण प्रशिक्षण आणि व्यावसायिक अनुभव घेतले ते त्यांना धाडसाने पुढे जाण्यास उपयुक्त ठरले. नोकरी ही केवळ नियुक्त कार्य करण्यासाठी नसून व्यवसायात खूप आंतमध्ये शिरण्याचे माध्यम म्हणून त्यांनी केली. म्हणूनच ते ‘स्वयंभू’ असे आपले स्वत:चे स्थान या व्यवसायात निर्माण करु शकले. कष्ट उपासण्याचे जिद्द, बुध्दीनिष्ठ व्यवहाराची पध्दती, संवादातून समन्वयाची भूमिका, अर्थव्यवहारातील पारदर्शकता, नियोजन, मराठी वाचकांची नाळ ओळखण्याची चतुरता, अथक परिश्रम घेण्याची वृत्ती ही त्यांच्या आजच्या प्रगतीची प्रमुख कारणे आहेत.

त्यांनी खानदेशात आधी वितरणाचे कार्य सुरु केले. त्यामाध्यमातून खानदेशातील गावोगावी विविध महाविद्यालये, ग्रंथालये आणि वाचकांशी सतत संपर्क वाढला. प्रत्यक्ष भेटीत ॠजुता, संयमशीलता, शांत चित्तवृत्ती आणि व्यावहारिकता यामुळे संवादातून-संपर्कातून माणसं जुळवणं ही त्यांची भूमिका यशस्वी ठरली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध विषयांच्या-वैविध्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या आणि कोर्सेसच्यासाठी लागणारी सोप्या भाषेतील व कमी किंमतीत उपलब्ध होणारी‘ पाठ्य पुस्तके’ तयार करण्याचे कार्य त्यांनी आरंभिले. त्यामुळे जास्त प्रतींची निर्मिती केली तर निर्मिती मूल्य घटते या विचारातून प्रगतीचा मार्ग सापडला. स्थानिक प्राध्यापकांची – लेखकांची अभ्यासास उपयुक्त पाठ्यपुस्तके निर्माण करण्याचा त्यांचा निर्णय खूप महत्वाचा ठरला. ‘प्रशांत बुक हाऊस’ च्या जोडीला सन 2002 मध्ये ‘प्रशांत पब्लिकेशन्स’चा नवा शाखा विस्तार अशा खडतर प्रवासातून झाला आहे. लेखकांची, कार्यालयीन वितरकांची, विविध बुक विक्रेत्यांची अशी एक ‘टीम’ त्यांनी तयार केली. त्यामुळे माणसे जोडली गेलीत. रोजी रोटीचा प्रश्नही काही तरुणांना सोडवता आला. त्यांच्या आयुष्यात श्री. रंगराव पाटील यांना कर्मसंस्कृतीची फुंकर घातली. त्यामुळेच “प्रशांत परिवार” ही कौटुंबिक जिव्हाळ्याची एक सामाजिक जाण असलेली संस्थाच निर्माण झाली असे म्हणता येईल. कला, वाणिज्य, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, शिक्षणशास्त्र, कायदा आणि आय.टी. इत्यादी सर्वच शाखांची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, वाङ्मयीन ग्रंथ आणि शब्दकोश इत्यादी पुस्तकांचे भांडार उभारुन त्यांनी खूप मोठी लोकशक्ती आणि लोकसेवा साध्य केली आहे. प्रथम वर्षापासून तर पदवी व पदव्युत्तर वर्गांच्या सर्वच पाठ्यपुस्तकांची निर्मिती आणि वितरण अशा द्विस्तरीय सेवेची सुमारे 25 वर्षे पूर्ण करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच श्री. रंगराव पाटील हे आहे यात शंकाच नसावी.

या त्यांच्या एकंदरीत प्रगतीचा नवा अध्याय आता दोन पातळीवर प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. त्यातील पहिला अध्याय म्हणजे “प्रशांत पब्लिकेशन्सचा नवीन वास्तूत प्रवेश” होत आहे आणि दुसरा अध्याय म्हणजे “अकॅडेमिक बुक हाऊस” या नव्या वितरण व्यवस्थेची मुहूर्तमेढ होत आहे. त्यांच्या या दोनही नव्या संकल्पांचे मन:पूर्वक स्वागत करतो. तरुणपिढीला घडवण्यासाठी, त्यांची ज्ञानलालसा जोपासण्यासाठी, वाचनसंस्कृतीच्या वृध्दीसाठी आणि पर्यायाने समाज आणि राष्ट्र निर्मितीच्या कार्यात आपला व्यावसायिक‘ खारीचा वाटा’ उचलण्यासाठी कटीबध्द झालेल्या मराठी माणसाला प्रगतीच्या दाही दिशांना मुक्तपणे संचार करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो. ज्ञानयुक्त भक्ती, भक्तीमय कर्म आणि कर्मनिष्ठ ज्ञानाची परंपरा सांगणार्‍या भारतीय संस्कृतीत ज्ञानात्मक आणि कर्मात्मक पातळीवर सचोटीने पुढे नेण्यासाठी; त्यांना ऊर्जा प्राप्त व्हावी यासाठी ही शब्दरुपी भावनांची गुलाब पुष्पे देऊन स्वागत!

हा त्यांचा ज्ञानदीप चेतवण्यांचा विचार, संत ज्ञानेश्वरांच्या शब्दातसांगायचा तर ज्योतसे ज्योत जलतो चलो।, प्रेमकी गंगा बहाते चलो॥ अशा स्वरुपाचा आहे. त्या ज्ञानज्योतीला सलाम! अज्ञानाच्या अंध:काराला नष्ट करण्याच्या प्रक्रियेतील एका कार्यकर्त्याला शुभेच्छा!

प्राचार्य डॉ. किसन पाटील,
अ.ज्ञा.प्र.मंडळाचे महिला महाविद्यालय,
जळगाव.