Your cart is empty now.
दूर संवेदन आणि भौगोलिक माहिती प्रणाली ही आधुनिक माहिती तंत्राज्ञानाचा एक भाग असून भौगोलिक व पर्यावरणीय अभ्यासात या तंत्रज्ञानाची एक महत्वाची भूमिका व वाटा आहे. व त्यामूळे मानवी प्रगतीस मोठा हातभार लागत आहे. अत्याधुनिक अदयावत तंत्रज्ञानाने समृद्ध अशी विमाने व उपग्रह यांच्या साहायाने दूरसंवेदन तंत्राच्या माध्यमातून बहुमोल अशी माहिती प्राप्त होवू लागली. तसेच भौगोलिक माहिती प्रणालीच्या माध्यमातून पृथ्वीवरील पर्यावरणीय व परिस्थितीकीय प्रक्रियांचे मापन करणे, भूपृष्ठीय वातावरणीय आणि जैविक घटकांसंबंधी सांख्यिकी माहिती मिळवणे सुकर झाले. या तंत्रज्ञानात मानवाने अवकाशात सोडलेल्या उपग्रहाद्वारे पृथ्वीचे सतत चित्रण सुरू असते. या चित्रणाची नोंद पृथ्वीवरील केंद्रामध्ये होत असते. पृथ्वीच्या भूपृष्ठभागावरील दूरवरची माहिती विद्युत चुंंबीय लहरींमार्फत उपग्रहांवर बसविलेल्या कॅमेरांद्वारे व स्कॅनरद्वारे चित्रीत केली जाते. दूर संवेदन हे एक तंत्रज्ञान असून त्याद्वारा भूपृष्ठावरील घटक किंवा वस्तूंच्या प्रत्यक्ष संपर्कात न येता त्यासंबंधींची माहिती मिळवणे, संकलीत करणे व त्यावरून त्या घटकाचे किंवा वस्तूंचे यथायोग्य वर्णन करणे या तंत्रास सर्वसाधारणपणे दूर संवेदन असे म्हणतात.