Your cart is empty now.
21 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात मराठी विज्ञान कथेने कोणते वळण घेतले आहे?
क्षणोक्षणी विस्तारत जाणाऱ्या विज्ञान-तंत्रज्ञानाने विज्ञान कथाकारांसमोर कोणती नवी आव्हाने उभी केली आहेत?
विज्ञानकथा या पदबंधातील एक पद म्हणजे ‘कथा’ झाकोळून जाते आहे का? की त्यातल्या विज्ञानाने कलापक्षावर मात केली आहे?
विज्ञान तंत्रज्ञानाने मानवी जीवन झपाटून टाकले होते आणि आहे. या झपाटलेपणाचा वेग किती? ते कोणत्या एककाने मोजायचे? विज्ञानकथाकारांना कथाकार आणि विज्ञान व्यासंगी या भूमिका सक्षमपणे पेलण्यासाठी आणखी काय करायला हवे?
हे व यांसारखे काही प्रश्न विज्ञान साहित्याच्या समीक्षेत निर्णायक आहेत.
मराठीतील विज्ञान कथेची समीक्षा कशी करावी?
तिच्या मूल्यमापनाचे निकष काय याचा वस्तुपाठ मी माझ्या या आधीच्या “मराठी विज्ञान साहित्य - स्वरूप आणि समीक्षा” या ग्रंथातून सुबोध जावडेकरांच्या विज्ञान कथेच्या साहाय्याने दिला आहेच.
विज्ञानकथेचे दोन प्रमुख पक्ष म्हणजे त्यातले विज्ञान सिद्धांतन आणि दुसरा म्हणजे त्यातले कथातत्त्व अर्थात वाङ्मयीन बाजू.
या दोन्हींची छाननी, मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे अपेक्षित असते. कथेतले विज्ञान सिद्ध आहे का?
कल्पित आहे का? की दोन्हींचे मिश्रण आहे? की छद्म आहे याचा निर्णय वस्तुनिष्ठ पुराव्यानिशी घ्यावा.
विज्ञानकथा आधी कथा असली पाहिजे. तिची वाङ्मयीन बाजू उणी पडता कामा नये. विज्ञानकथा मुळात मानवाचीच कथा असते असे म्हटले जाते. विज्ञानाचे चांगले वाईट परिणाम मानवी जीवनावर कसे झाले? विज्ञान कथा उघडपणे अथवा सुप्तपणे कोणता बोध देते? वैज्ञानिक दृष्टी रुजविण्यात ती कितपत यशस्वी होते? यांसारख्या निकषांवर विज्ञान कथेची समीक्षा झाली पाहिजे.
ही समीक्षा प्रचलित मराठी समीक्षेसारखी शब्दबोजड, शब्दबंबाळ, संकल्पना बोजड असता कामा नये. विज्ञानकथेतले ‘कथ्य’ आणि विज्ञान ‘तथ्य’ वस्तुनिष्ठपणे
शोधून त्याचे मूल्यमापन समीक्षकाने केले पाहिजे. कथेची सामर्थ्य स्थळे आणि दोष स्थळे (मर्यादा स्थळे) समीक्षकाने उलगडून दाखविली पाहिजेत. कथेत काही तांत्रिक दोष, विज्ञान सिद्धांतातील अपूर्णता, अथवा असत्यता, मांडणीतील प्रमाद, आशयाच्या उणिवा केवळ दाखवून उपयोगाचे नाही. हे दोष का घडले?
ते कोणत्या उपायांनी टाळता आले असते हे सांगणे देखील विज्ञान समीक्षकाचेच कार्य आहे.
साहजिकच त्यासाठी पुरेशा विज्ञान व्यासंगाची जशी गरज आहे तशी साहित्याच्या व्यासंगाची देखील तेवढीच, सम प्रमाणात गरज आहे.
विज्ञान कथा जशी विज्ञानापेक्षा मानवाची कथा असते असे म्हटले जाते. याच धर्तीवर असेही म्हणता येईल की, विज्ञान साहित्याची, विज्ञानकथेची समीक्षा ही विज्ञानासोबतच वाङ्मयाची देखील समीक्षा असते.
बहुसंख्य समीक्षकांना विज्ञानकथेतील वाड्मयीन बाजूचे मूल्यमापन करता येणे फारसे अवघड नसते.
पण विज्ञानकथेतील विज्ञान सिद्धांताचे स्वरूप, त्याचे मूळ, त्याचा कल, विज्ञान सिद्धांत सोपे करून मांडण्याची त्या त्या लेखकाची स्वतंत्र शैली, कथेतल्या विज्ञानाची रुक्ष अथवा प्रासादिक व रंजक मांडणी, कथेतले वास्तव विज्ञान संपून कल्पित विज्ञान कुठे सुरू झाले? विज्ञान सिद्धांत जर वास्तव अथवा सिद्ध असतील तर त्यांचे उपयोजन दैनंदिन जीवनात कसे होऊ शकेल याचे दिग्दर्शन, विज्ञान सिद्धांतांचे मानवी जीवनावरील संभाव्य चांगले वाईट परिणाम कोणते?
नित्य बदलणाऱ्या, नवी झेप घेणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानाचे सर्व विभ्रम आकलित होण्याचे सामर्थ्य विज्ञानकथाकाराकडे आहे काय?
या व यांसारख्या अनेक गोष्टी विज्ञानसाहित्याची समीक्षा करणाऱ्या समीक्षकाने तपासून घ्यायला हव्यात. ही तपासणी क्षमता या समीक्षकाकडेअसणे गरजेचे आहे.
थोडक्यात विज्ञान समीक्षकाची विज्ञान जाणीव, विज्ञानव्यासंग देखील लुळा असता कामा नये.
म्हणून विज्ञानसाहित्याचा समीक्षक हा प्रचलित मराठी साहित्य समीक्षकापेक्षा वेगळा असतो.
प्रस्तुत ग्रंथातून प्रातिनिधिक अशा चार विज्ञान कथांची समीक्षा केली आहे.
थर्डमॅन - डॉ. संजय ढोले; बीजांकुर - डॉ. रंजन गर्गे; डम्पी - चंद्रकांत घाटाळ; कार्डिओ -77 - सुनिल विभूते अशा या चार कथा विज्ञानकथा आहेत.
प्रत्येक कथेचे विज्ञानप्रांत परस्पर भिन्न आहेत. अनुक्रमे टाईम मशीन; सरोगेट मदर; स्पेस सायन्स; मेडीकल सायन्स अशी ही भिन्नता असली तरी मानवी
जीवनावरील प्रभावाचे चित्रण हा एकच हेतू या निर्मिती मागे आहे.
या चारही कथा प्रस्तुत ग्रंथात समाविष्ट करण्यासाठी चारही लेखकांनी संमती दिली त्यांचे व त्यांच्या प्रकाशकांचे अनुक्रमे मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे; स्पॅन पब्लिकेशन, औरंगाबाद; डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई; राजहंस प्रकाशन, पुणे यांचे मनःपूर्वक आभार! तसेच प्रशांत पब्लिकेशन्सचेही आभार!
पैकी प्रा. विभूते, डॉ. गर्गे, डॉ. ढोले हे विज्ञानाचे शिक्षक आहेत. डॉ. ढोले तर संशोधकही आहेत.
या चारही कथांचे हे विज्ञानसाहित्याच्या समीक्षेचे निकष लावून केलेले मूल्यमापन आहे.
मराठी विज्ञान कथेची समीक्षा कशी करावी? ती कशी असावी? याचे काही एक दिग्दर्शन विज्ञान साहित्याची समीक्षा करू पाहणाऱ्या नव्या पिढीच्या तरुण समीक्षकांना व्हावे ही अपेक्षा आहे आणि त्याच्यापूर्तीतच या ग्रंथाचे सार्थक ही आहे.