Your cart is empty now.
‘बहिणाईची गाणी’ चे गारूड 1952 पासून मराठी मनावर कायम आहे. ‘बहिनाईना गाना’ हा बहिणाईची गाणी अहिराणी बोलीत अनुवाद करणारा आगळावेगळा उपक्रम आहे. एका बोलीतून दुसऱ्या बोलीत अनुवादाचा हा पहिलाच प्रयत्न ठरावा. बहिणाबाईंच्या गाण्यांची निर्मितिप्रक्रिया सहृदयपणे उलगडून दाखवणारी ‘खोप्यामधी खोपा’ ही कादंबरी, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ‘बहिणाबाई चौधरी’ हा काव्यचिकित्सा करणारा मोनोग्राफ, ‘बहिणाईची गाणी ः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ इ. पाच सहा पुस्तकांमधून बहिणाबाईंचे काव्यकर्तृत्व वस्तुनिष्ठपणे, विविध अंगांनी मांडणारे प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे या अनुवादाच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या भाषेबद्दलचे गैरसमज तर दूर करतातच, त्यासोबतच बहिणाबाईंच्या गाण्यांची अहिराणी बोलीत नवनिर्मितीदेखील त्याच ताकदीने, त्याच अष्टाक्षरी छंदात रसिक वाचकांना उपलब्ध करून देतात. अनुवादविज्ञानाचे भान सांभाळून आणि बोली रूपांतराच्या मर्यादांची जाण ठेवून केलेला हा, ‘बहिनाईना गाना’ नामक अनुवाद बहिणाबाईंच्या काव्यास्वादाला पूरक आणि पोषक ठरावा.