Your cart is empty now.
नुकताच साठीमध्ये प्रवेश केलेली मी ललितगद्य लेखनाकडून वैचारिक लेखनाकडे कधी वळली हे माझे मलाच कळले नाही. मनात विविध विषयांचे चिंतन, मनन सातत्याने सुरू असते. डोळे अवती-भवतीचे जग न्याहाळत असते, तर कान श्रवणाची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडतात. वाचनाचा छंद असल्याने मनातील एखाद्या विषयाच्या चिंतनाला एक प्रकारे पाठबळच मिळत असते. मनात भावना व विचारांचे जे मंथन चालत असते ते लेखणीच्या माध्यमाने कागदावर शब्दबद्ध करावे या हेतूने लेखन करीत राहिली. मुद्रित शोधन करताना जाणवले की हा प्रवास तर वैचारिक लेखनाचा आहे. कदाचित वाढत्या वयाचा हा प्रभाव असावा. साठीकडे
झुकलेले वय आपोआप चिंतनाच्या प्रवाहात आले. त्याला थांबवू शकल नाही. खरे तर योग्य ते विचार व भावना यांना व्यक्त करीत राहावे. त्यातून समाजाचे हित साधले जाते. मी तर केवळ एक माध्यम आहे. न दिसणारी ब्रह्मांड शक्ती, परमात्म शक्तीने माझ्याकडून हे लेखन कार्य करून घेतले. यासाठी या शक्तीच्या मी ऋणातच राहू इच्छिते. भविष्यातही या शक्तीने माझा लेखनासाठी माध्यम म्हणून उपयोग करावा, तशी संधी मला द्यावी ही मनःपूर्वक प्रार्थना. माझे विद्यार्थी, महाविद्यालयातील सहकारी, माझ्या मैत्रिणी, नातेवाईक व इतर वाचकांनी माझ्या आतापर्यंतच्या लेखनाची दखल घेऊन आवर्जून प्रतिक्रिया दिल्या.