Your cart is empty now.
वर्णनात्मक भाषाविज्ञान ही भाषा विज्ञानाची एक शाखा. भाषा लवचिक, परिवर्तनशील, सांस्कृतिक आणि सामाजिक असल्याने भाषेचे स्वरूप आणि कार्य पद्धतीचे वर्णन करणारे, भाषेच्या संरचनेचे, ध्वनींचे, रूपांचे आणि वाक्यांच्या रचनेचे विश्लेषण करणारे हे शास्त्र आहे. कोणत्याही भाषेचा अभ्यास तिच्या मूळ स्वरूपात करून भाषेतील नियम, व्याकरण, शब्दसंग्रह, उच्चार आणि भाषेच्या विशिष्ट स्थितीचे विश्लेषण, यांचा अभ्यास यात केला जातो. भाषेची संरचना समजून भाषेतील विविध घटकांमधील संबंध शोधण्याचे कार्यही वर्णनात्मक भाषाविज्ञान करते.
भाषा व्यवहार पूर्ततेसाठी दोन घटक महत्त्वाचे. बोलणारा व ऐकणारा. हे दोन्ही घटक एकाच क्रियेची दोन अंगे. बोलणाऱ्याने वागेंद्रियाच्याद्वारे आपल्या मनातील विचार, भावना प्रकट करण्यासाठी सार्थ ध्वनीचे उच्चारण केले आणि ऐकणाऱ्याने त्यातील आशय ग्रहण केला म्हणजे भाषा कार्य पूर्ण. भाषा ही संकेताधिष्ठीत संदेशन प्रक्रिया. ध्वनी, शब्द, वाक्य आणि अर्थ मिश्रित संघटनसुद्धा. परंपरेने चालत आलेला सामाजिक वारसा असलेला ध्वनीचा सार्थ समूह असलेली शारीरिक व मानसिक क्रियांच्या संयोगातून सिध्द होणारी परिवर्तनशील चिन्हांकीत तशीच ध्वनीरूप मौखिक व्यवस्था ही आहे.
या ग्रंथात विद्यापीठाच्या तृतीय वर्षाच्या मराठीच्या अभ्यासक्रमानुसार विविध घटकांचे सविस्तर विवेचन केलेले आहे. वागेंद्रियाची रचना व कार्य, अवयवांचे उच्चारण, ध्वनींची निर्मिती प्रक्रिया, उच्चारण अवयवांनुसार वर्षांचे गट, तिच्या अभ्यासाच्या पद्धती, तिची कार्यप्रणाली, तिचा इतिहास, दोन भाषेतील वेगळेपण आणि साम्य, त्यांच्या रचनेतील, अर्थातील वेगळेपण आणि साम्य, अनेक भाषातज्ञ याची मत मतांतरे, स्वनांचे वर्गीकरण व स्वन-स्वनीम-स्वनांतर, स्वनिम निश्चितीचे तत्वे, विनियोगोचे प्रकार व मराठीची स्वनिम व्यवस्था, रूप-रूपिम - रुपिकांतरे रूपा-रूपातील संबंध, रूपिम विनियोगाचे प्रकार, रूप अर्थ संबंध, वाक्याचे घटक, प्रकार आणि वाक्याची संरचना, वाक्याविन्यास, अर्थविन्यास, अर्थः अर्थातील संबंध अनेकार्थता, अर्थविन्यासातील अर्थाची प्रतिती देणारे महत्त्वपूर्ण घटकांचे विवेचन आणि त्यावरील प्रात्यक्षिकांचे नमुने दिले आहेत. या मजकूरांची शीर्षक अनुक्रमणिकेच्या दर्पणात आपल्याला दिसतीलच. या विवेचनाचा भाषेचे अभ्यासक, अध्यापक आणि विद्यार्थी यांना उपयोजन करता येईल. तसेच वर्णनात्मक भाषाविज्ञान अभ्यासक्रमातील घटकांवर आधारित प्रात्यक्षिक कार्याचा प्रथमच समावेश या ग्रंथात केला आहे. त्यासाठी प्रश्न संचांचा समावेश करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक कौशल्य व भाषिक उपयोजन क्षमता विकसित होणार आहे.