Your cart is empty now.
वस्ती हा मानवी संस्कृतीचा एक अविष्कार असतो. मानवी गरजा या मोठ्या प्रमाणात नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतात. त्यामुळे मानवाचे पर्यावरणाशी चांगले संबंध असणे महत्त्वाचे असते. वस्ती हा मानव आणि निसर्ग यांच्या क्रिया प्रक्रियांचा एक आलेख असतो. प्रत्येक वस्तीचा आकृतीबंध वेगळा असतो. वस्त्यांचे वितरण वेगवेगळे झालेले असते. त्या सर्व बाबींवर प्राकृतिक घटकांचा परिणाम झालेला असतो. वस्त्यांना प्राकृतिक घटकांमुळे एक विशिष्ट पार्श्वभूमी प्राप्त होते. मानवी संस्कृतीची विविध अंगे वस्तीत प्रतिबिंबित होत असतात. मानवाचा धर्म, मानवाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, सामाजिक पद्धती यांचा ठसा वस्त्यांवर पडलेला असतो. काळाच्या ओघात तंत्रज्ञान, मानवी संस्कृती, विज्ञान यात खूपच प्रगती होऊन याचा प्रभाव वस्त्यांवर होत असतो. वस्त्यांमधील विविध घटक परस्परावलंबी व परिवर्तनशील असतात. त्यांच्यातील संबंधाचे स्वरुप गतीमान असते. या गतीमानतेचा परिणाम वस्त्यांवर होतो. वस्ती व तिचे पर्यावरणाशी असलेले संबंध, वस्त्यांमधील परस्परसंबंध हे वेगवेगळे असून त्यांच्यात स्थलसापेक्षतेबरोबरच कालसापेक्षताही असते. हे सर्व परस्परातील संबंध लक्षात घेतल्याशिवाय वस्तीभूगोलास पूर्णत्व येत नाही.