दख्खनच्या सहा सुभ्यापैकी खानदेश हा एक महत्त्वाचा आणि समृद्ध सुभा होता. इ. स. 1752 साली भालकीच्या तहाने तो मराठ्यांच्या ताब्यात आला. या सुभ्याचे वैशिष्ट्य म्हणजे या सुभ्यातील प्रशासनाचे कांही पैलू हे मराठी राज्यात अस्तित्वात असलेल्या प्रशासनापेक्षा भिन्न होते. त्यावर फारुकी आणि मोगल शैलीचा प्रभाव होता. यात मराठा काळात कांही बदल झालेत काय? किंवा मराठा प्रशासन आणि येथील प्रशासनात कोणता फरक होता याबाबत आजपर्यंत कोणी संशोधन केले नाही. खानदेशच्या प्रशासनात अनेक कर्तबगार अधिकारी होवून गेलेत. कुकुरमुंढ्याचा कमाविसदार असाच एक कर्तबगार अधिकारी होता.
कुकरमुंढ्याच्या कमविसदाराला त्या भागातील रयतेची पिके भिल्लांचा उपद्रवापासून वाचविणे महत्त्वाचे होते. म्हणून तो आपल्या पत्रात पुढे पेशव्यांना लिहितो की, कंकालेकर भिल्लांचा मोड करणे हे अशक्य आहे असे नाही. पण जमा थोडी खर्च फार ऐसा प्रकार आहे. म्हणून कंकालेकाराशी करार केला. अशी बुद्धिचातुर्य वापरणारी अधिकारी मंडळी या सुभ्यात होवून गेली. ती प्रथम अप्रकाशित पेशवे दप्तरातून या ग्रंथाद्वारे उजेडात येत आहे.
खानदेशमधील शहरे, उद्योगधंदे, सावकारी व्यवसाय, ग्राम वतनदार, वस्तूंच्या किंमती, कृषी जीवन, चलन व्यवस्था आणि येथील सांस्कृतिक जीवन यांचा अप्रकाशित मौलिक साधनांच्या सहाय्याने आढावा घेत हा ग्रंथ वाचकांच्या हाती सोपवीत आहे. तो मराठ्यांच्या इतिहासात नक्कीच भर टाकणारा आहे. या आत्मविश्वासाने हा ग्रंथ आपल्या हाती सुपुर्द करीत आहे.
Madhyaugin Khandesh