• कथारंग

    विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना विज्ञान कथा व विनोदी कथा अशा दोन कथाप्रकारांची ओळख करून देणारे सदर पुस्तक आहे. मानवी नातेसंबंध, मानवी मूल्ये यांपुढे विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अफाट प्रगतीने उभी केलेली आव्हाने विद्यार्थ्यांनी जाणून घ्यावीत आणि त्याबाबतची त्यांची जाण प्रगल्भ व्हावी या भूमिकेतून विज्ञान कथांची निवड करण्यात आली आहे. आभासी विश्वाच्या तात्कालिक भुलभुलैयात गुरफटल्यामुळे जगण्यातील समाधानाचे क्षण हातातून निसटत चालले आहेत. शब्द, वाक्य, भाषा, स्वभाव, वर्तन, व्यवहार अशा विविध स्तरांवरील गमत-जमती आज सापडेनाशा झाल्या आहेत. याचे भान विद्यार्थ्यांना यावे म्हणून विनोदाच्या निरनिराळ्या परी व्यक्त करणार्‍या निवडक विनोदी कथांचा समावेश सदर पुस्तकात करण्यात आला आहे. यासोबतच विज्ञानकोशासाठी नोंद लेखन आणि विज्ञानपर लघुलेख लेखन या उपयोजित घटकांची जोड येथे देण्यात आली आहे.

    Katharang

    85.00
    Add to cart
  • कथाविश्व

    कथांची निवड करतांना सद्य ः कालीन जीवनाचे प्रश्न व मूल्यविवेक यांचा विचार केलेला आहे.
    ‘मानवता हे मूल्य जात, धर्म, पंथ, संप्रदाय, प्रदेश विशिष्टता यांच्या पलीकडे असलेले सर्वेच्च मूल्य आहे’ – हे वामन चोरघडे यांच्या ‘हादरा’ या कथेचे प्रमुख सूत्र आहे.
    ‘प्रसार माध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून घटनांचे वार्तांकन केले नाही तर एखादी क्षुल्लक घटना मोठ्या उद्रेकाचे कारण ठरु शकते.’ हे अरुण साधूंच्या ‘दंगा’ कथेतून सूचित केले आहे.
    ‘माणूस हा बुद्धीचं वरदान लाभलेला प्राणी आहे. पण बुद्धीच्या पाठीमागे भाव असावा की भोग? बुद्धीचा उपयोग भोगासाठी केला की माणसाचा पशू होतो’. हा रत्नाकर मतकरींच्या ‘एक माणूस आणि एक पशू’ या कथेचा आशय आहे.
    ‘केवळ देणं हाच ज्यांचा जीवनधर्म आहे; अशी माणसं जेव्हा स्वतःसाठी मागतात तेव्हा त्यांच मोठेपण संपून जातं.’ हे कल्पवृक्षाच्या रुपकातून विजया दिक्षित यांनी ‘एका झाडाची इच्छा’ या कथेतून मांडलेलं आहे.
    ‘श्रद्धा, लेाकश्रद्धा, अंधश्रद्धा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यांचे संस्कार. बालसुलभ मनावर कसे कोरले जातात’ याचे प्रत्ययकारी दर्शन योगीराज वाघमारे यांच्या ‘गुडदाणी’ कथेतून घडते.
    ‘वठलेलं झाड फुलवण्यासाठी कोवळ्या अंकुराचा बळी देणं कितपत संयुक्तिक आहे.’ हा प्रश्न ‘महात्मा’ कथेद्वारे लक्ष्मण लोढे यांनी उपस्थित केला आहे.
    ‘रोजा-एकादशी आणि भाकरी यांची कष्टकर्‍यांच्या वेदनेशी-जोडलेली नाळ’ संजीव गिरासे यांच्या ‘जकात’ कथेत दिसते.
    सारांश या कथा विद्यार्थ्यांना व वाचकांना व्यक्तीजीवन व समष्टीजीवनाचं उन्नयन करणार्‍या मूल्यांची ओळख करुन देतील. असा विश्वास वाटतो. कथेच्या रुपबंधाच्या अभ्यासाच्या जोडीने कथेतील चिरंतन मूल्यांचाही विचार व्हावा ही अपेक्षा आहे.

    Kathavishrva

    50.00
    Add to cart
  • काव्यतरंग

    मानवी समाज व्यवस्थेत अनेक प्रकारचे जगण्याचे दृष्टीकोन असतात. व्यवस्थेबद्दल काही बोलताना कवीची कविता ही व्यवस्थेशी निगडीत असलेल्या अनेक पैलूंमधून वाचकांसमोर येत असते. कवीच्या काव्यातील जाणिवांचा अपरिहार्य भाग काव्यरुपाने रसिक वाचकांसमोर येत असतो. त्यातून कवीचे भावविश्व व एकंदर परिस्थितीचे आकलन होताना दिसते. भोवतालच्या बदललेल्या वास्तवाचे केवळ वर्णन न करता कवी आजच्या माणसासमोरचे जगण्याचे प्रश्न टोकदारपणे मांडताना दिसतात. वाड्या-वस्त्या, ग्रामीण, निमशहरी, शहरी या परिसरातील मानवी जीवनाचे जगण्याचे ताणे-बाणे, अंतर्गत व बाह्य संघर्ष, कवींच्या लेखणीतून अपरिहार्यपणे येतात. भावनांनी ओथंबलेल्या कवी मनाचे अविष्कार विविध विषयांना थेटपणे भिडतात.
    नव्या कवींकडे असलेली सर्जनात्मक प्रतिभा मानवी समाजव्यवस्थेला आस्वादात्मक पातळीवर कशा प्रकारे आकृष्ट करते यावर त्या कवीच्या कवितेचे मूल्यमापन होते. या कसोटीवर खानदेशच्या कवींनी लिहिलेल्या कविता एक नव्या दिशेकडे नेणार्‍या आहेत हे निश्चित.

    Kavyatarang

    60.00
    Add to cart
  • काव्यधारा

    एखादी व्यक्ती कवी आहे; म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण ती कवितेतच जगते असे नाही, तर प्रतिभेचा झटका यावा आणि कविता लेखनाला प्रारंभ करावा, हा प्रारंभ रात्री अपरात्री, सकाळ, दुपार, सायंकाळी केव्हावी कुठेही असू शकतो किंवा होऊ शकतो. एकतानतेमधून निर्माण झालेला हा प्रारंभ कवितेच्या निर्मितीची अस्सलपणाची नांदीच दर्शवित असतो. कविता प्रारंभ होते तो क्षण ते कविता समारोपाचा क्षण येथपर्यंतच प्रत्येक कवी हा कवी असतो. नंतर त्याची कविता ही त्याची न राहता लोकांची बनून जाते; ज्यावेळी रसिक वाचकांच्याच अनुभवाचं, स्पंदनांचं आणि जीवनाशयाचं संगीत बनून जाते!

    Kavyadhara

    85.00
    Add to cart
  • काव्यसुधा

    वाहरु सोनवणे, प्रकाश किनगावकर आणि अशोक कोतवाल हे खानदेशातील समकालिन कवितेचे महत्त्वाचे प्रतिनिधी आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर खानदेशासारख्या ग्रामीण आदिवासी बहुल भागात सामाजिक स्तरावर घडून आलेल्या स्थित्यंतरातून ह्या कवींच्या जाणिवांना अभिव्यक्त होण्यास संधी मिळाली. 1975-80 नंतर ओस पडलेल्या खेड्यांमधून शिकलेली तरुण मुले नोकरीच्या निमित्ताने शहरात स्थायिक झाली. हळुहळु ‘शहरी’ होत गेली. पण गावाशी, गावाच्या कृषीजीवनाशी असलेली नाळ मात्र त्यांना तोडता आली नाही. यातून वाट्यास आलेले दुभंगलेपण प्रकाश किनगावकरांच्या कवितेला प्रेरणा देणारे ठरले. ज्यांच्या घरातली पहिली पढिी शिक्षणाकडे वळू लागली आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडू लागली, अशा आदिवासी बांधवांना स्वतःची संस्कृती व जीवनविशेष शहरी संस्कृतीच्या झगमगाटात उपरे ठरत असल्याचे जाणवू लागले. स्वातंत्र्याचे लाभ व लोकशाहीची हमी यांपासून वंचित ठेवल्या गेलेल्या आणि शोषणव्यवस्थेच्या बळी ठरलेल्या आदिवासींचा हुंकार वाहरु सोनवणे यांच्या कवितेतून प्रकट झाला. अशा संवेदनशील मनांची नागरी जीवनाच्या धबडग्यात होणारी घुसमट अशोक कोतवाल यांच्या कवितेतूनही आलेली आहे. आधुनिकीकरण व जागतिकीकरण या नावाखाली सुरु असलेले सामान्य माणसांचे अगतिकीकरण विशेषतः मूल्यर्‍हास व मानसिक पातळीवरील पडझड याचे सूक्ष्म व मार्मिक भान कोतवालांची कविता व्यक्त करते.

    Kavyasudha

    45.00
    Add to cart
  • ज्ञानदीप (भाग 2)

    या पाठ्यपुस्तकाचे वैशिष्ट्य असे की, यात समाविष्ट केलेले वैचारिक, ललित लेख व कविता विविधांगी स्वरुपाचे आहेत. अशा विविध विषयांतून विद्यार्थ्यांची वाङ्मयीन अभिरुची वाढावी तसेच सामाजिक बांधिलकी, मानवता, नीनिमत्ता, औद्योगिकता, पर्यावरण, विज्ञाननिष्ठा, जागतिकीकरण, देशभक्ती यांचे भान निर्माण व्हावे, त्याच प्रमाणे मराठी भाषेबद्दलची आस्था आणि एकूण आपलेपणाची विसरत चाललेली नाती या बद्दलची पुन्हा ओढ निर्माण व्हावी व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या दृष्टीने या पुस्तकातील लेख आणि कविता संपादित केल्या आहेत.

    Dnyandip (Bhag – 2)

    60.00
    Read more
  • झडती पिढीपेस्तर प्यादेमातची

    या देशाची वाटचाल महासत्तेकडे चालली आहे. हे एक सुंदर स्वप्न आहे. मात्र आजच्या घडीला हा देश खर्‍या अर्थाने सुखी-समृद्ध कसा होणार हा चिंतनाचा मुख्य मुद्दा असला पाहिजे आपला देश ‘कृषी-प्रधान’ आहे हे भावनिक विधान किती काळ चालविणार, जागतिकीकरणात आपली 90% शेती संपत चालली आहे. ‘शेतकर्‍यांच्या आत्महत्या’ काळजाला रक्तबंबाळ करणार्‍या आहेत बेरोजगारांच्या फौजा, उपाशी पोटांची वाढत जाणारी संख्या, शेतीचे नापिकीकरण, या सर्व समस्यांवर सक्षम उपाय शोधून काढले तरच शेती, शेतकरी व देश सावरेल, यासाठी विज्ञान तंत्रज्ञानाबरोबरच, गावागावात सेंद्रीय शेतीचे महत्व, वनराई बंधारे, म. फुलेंची पाणी व शेतीविषयक धोरण, सक्षम बियाणांचे जाळे विणावे लागेल. चांगले उपक्रम चिरंतर राबवावे लागतील. श्रमाला, शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्वांनाच झोकून द्यावे लागणार आहे. पिढ्यान्पिढ्या पोसणार्‍या शेतीला समृद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सर्वांनाच करावी लागणार आहे. तरच या देशाची वाटचाल महासत्तेकडे होईल. मग कोणाची झडती. घेण्याची गरज भासणार नाही.

    Zadti Pidhipestar Pyadematchi

    150.00
    Add to cart
  • निर्झरास… निवडक बालकवी

    केवळ अठ्ठावीस वर्षांचं अल्पायुष्य लाभलेले बालकवी अर्वाचीन मराठी काव्यपरंपरेत अनन्यसाधारण कवी ठरलेत. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. केवळ दहा-अकरा वर्षे कविता लेखन करणार्‍या या प्रतिभासंपन्न कवीने आयुष्यात केवळ एकशे त्रेसष्ठ कविता लिहिल्या. त्यात पस्तीस ते चाळीस निसर्गकविता व उर्वरित कविता (पूर्ण-अपूर्ण अवस्थेतल्या) काव्यविषयक, प्रेमविषयक, गुढगुंजनात्मक, सामाजिक तथा राष्ट्रभक्तीपर स्वरूपाच्या आहेत.

    बालकवी हे बालपणापासून निसर्गातच रमले. शिवाय जीवनातल्या एकटेपणाला कटांळून निसर्गाकडे त्यांचे पलायन झाल्यामुळे त्यांची काव्यवैशिष्ट्ये ही निसर्ग कवितेत अधिक खुलुन दिसली. खानदेशातल्या मातीत रुजलेल्या या औदुंरबरावर अल्पवयातच काळाचा घाला आला. परंतु या औदुंबराच्या मूळा आजही कुठल्यातरी अनामिक ओलाव्यानं तगून आहेत. आज जवळपास एक शतक उलटलं तरीही मराठीतल्या साहित्यिक, रसिक, समीक्षकांना बालकवीची कविता नवनव्या अर्थगर्भ छटांनी, नवनव्या रूपात सापडत आहे. ‘बालकवी’ हे मराठी कवितेला पडलेलं एक मधुर स्वप्न आहे, अशा शब्दात समीक्षकांकडून त्यांचा गौरव झाला आहे. बालकवींची कविता अभिजात कविता ठरते. त्यांचा संप्रदाय निर्माण झाला नाही. परंतु एकूणच अर्वाचीन मराठी कवितेपासून ते आजतागायत लिहिणार्‍या सार्‍याच पिढीला बालकवींच्या कवितेने वेड लावले आहे.

    निर्झरास.. हे बालकवींच्या निवडक कवितांचे संकलन अभ्यासकांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल.

    Nirzaras Nivdak Balkavi

    50.00
    Add to cart
  • निवडक कथा

    कथा हा वाङ्मय प्रकार अतिशय लवचिक असतो. जीवनातले विविध ताण-तणाव, प्रसंग, घटना कथेच्या केंद्रस्थानी असतात. मराठी कथेचा प्रवाह लोककथा, जातककथा, जातककथा, इसापनिती, पंचतंत्र इत्यादीनी समृद्ध आहे. प्रत्येक काळात त्यात भर पडतच आहे. साहित्याने जग अधिक सुंदर, लोभस, मोहक करावे हा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. अनुभवाची श्रीमंती, समृद्धी हेच साहित्यिकांचे खरेखुरे वैभव असते. उत्कट जिज्ञासेपोटी व संवेदनशील मनातून चांगल्या साहित्याची निर्मिती होते. ‘निवडक कथा’ निवडताना विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा निश्चितपणे विचार केलेला आहे. या कथा तरुणाईला भावतील अशाच आहे. कथांची निवड करताना मूल्य, संस्कार यांना निश्चितच महत्त्व दिले आहे. कथांमधून उमद्या भावनांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल व विद्यार्थ्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वासाठी ह्या कथा निश्चितच महत्त्वपूर्ण ठरतील असा विश्वास वाटतो.

    Nivadak Katha

    75.00
    Add to cart
  • बहिणाईची गाणी

    कविता ही कवीला उपलब्ध असलेल्या जीवनावकाशाची अभिव्यक्ती असते. कौटुंबिक ते सामाजिक अशा विभिन्न स्तरांवरील भावभावना, संवेदना, विचार, अनुभव यांचे विश्व जीवनावकाशाला आकार देत असते. अशा जीवनावकाशाला अंत:करणात मुरवून शब्दबद्ध करण्यातून कवितेच्या निर्मितीला अवसर प्राप्त होत असतो. ही प्रक्रिया जितकी मौलिक तितकी कवितेतील काव्यात्मता खुलून येत असते. या निकषावर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी साकारलेले काव्यविश्व अनोखे आहे. कृषिजनसंस्कृती, तिचे भरणपोषण करणारा निसर्ग, नातीगोती, सण-उत्सव, कष्टकर्‍यांच्या जगण्याची लय, गावगाडा या जीवनावकाशाच्या गाभ्याला अंत:करणात मुरवून शब्दांवाटे आपल्यापर्यंत पोहचविणारी ही कविता काव्यात्मतेचा उत्तुंग आविष्कार आहे. मानवी जीवनाला तोलून धरणार्‍या सचोटी, मेहनत, कर्तृत्व, जिव्हाळा, सुख-दु:खविषयक समभाव, सश्रद्ध वृत्तीचा स्वीकार-अंधश्रद्ध वृत्तीला नकार, साहचर्य भावना, धैर्य अशा आधुनिक मानवाच्या जगण्यातून हरपत गेलेल्या मूल्यभावाचा झरा अनेकवार आपल्या अंत:करणात पाझरविणारी ही कविता आहे. कविता आणि जगणे यांच्या अद्वैताचा हा अक्षय ठेवा अनेक पिढ्यांना पुरणारा आहे.

    Bahinabaichi Gani

    110.00
    Add to cart
  • बिल्वदल

    साहित्य नेहमीच माणसाला सहाय्य करीत आलेलं आहे. तेच त्याच्यासाठी आशेचं, साहसाचं आणि शौर्याचं प्रेरणास्त्रोत बनून राहिलं आहे. भल्याबुर्‍याच ज्ञान त्याने साहित्याद्वारेच मिळवलं आहे. वरवर पाहिलं तर असं वाटेल, की साहित्यिक केवळ माणसाच्या दैहिक दुःखाचं आणि त्याच्या हर्षोल्हासाचं चित्रण करतोः पण वास्तवात त्याच्या प्राणात वसत असलेल्या दीपशिखेला चेतवणं हा त्याचा उद्देश असतो. काळाबरोबर जीवनाची मूल्यंही बदलतात. त्या परिवर्तनाचं स्वागत करणं हे साहित्याचं कर्तव्य आहे आणि युगाप्रमाणे जीवनमूल्यांची स्थापना करणं हेही साहित्याचं कर्तव्य आहे.

    – वि. स. खांडेकर

    Bilvadal

    70.00
    Add to cart
  • साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे निवडक ललित गद्य

    ललित निबंधात आत्मनिष्ठ लेखन असते. आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या साहित्यात व्यक्त होणारे अनुभव हे ‘मी’ च्या जीवनातीलच असतात
    कधी ते उघड उघड आत्मनिष्ठ लेखनपद्धतीने प्रत्यक्षरुपात, तर कधी वस्तुनिष्ठेचे रुप धारण करुन छुप्या पद्धतीने अगर दुसर्‍या व्यक्तींच्या (पात्रांच्या) नावावर अप्रत्यक्ष रुपात, तर कधी आदर्शवादाच्या, उदात्तीकरणाच्या प्रेरणेने स्वेतर मानवी मनाच्या आविष्काराच्या रुपात अवतरत असतात. म्हणजे अंतिमतः साहित्य हा आत्मनिष्ठेचाच आविष्कार आहे असे मानले तर ‘ललित लिबंण’ हा साहित्यप्रकार इतर सर्वच साहित्यप्रकारांना प्रत्यक्षाप्रत्यक्ष रुपात व्यापून उरतो, असे मानावे लागते
    पण तत्त्वज्ञानाच्या एवढ्या व्यापक पातळीवर जाऊन ललित निबंध या साहित्यप्रकाराचा विचार करणे इथे अभिप्रेत नाही
    या सगळ्या मर्यादा गृहीत धरुन ललित निबंध या साहित्यप्रकाराचा विचार करायचा आहे.

    – आनंद यादव

    Sahitya Akadmi Purskar Pratpa Sahityikanche Nivadak Lalit Gadya

    70.00
    Add to cart
  • साहित्यविचार (भारतीय आणि पाश्चात्त्य)

    साहित्याचा अभ्यास करीत असताना साहित्यनिर्मितीची प्रक्रिया, त्यातील मूलभूत घटक, साहित्याला साहित्यपण प्राप्त करुन देणारी विविध अंगे, साहित्याला सजीवतेकडे नेणारे भाषा हे माध्यम अशा बाबींचा अभ्यास टाळून चालणार नाही. अन्यथा साहित्याच्या सार्वभौम जगाशी आपला नीटसा परिचय होणार नाही. हे लक्षात घेतले तर ‘साहित्यविचार’ या विषयाचे आजही असणारे महत्त्व आपल्या लक्षात येईल. याची जाण बाळगणारे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. प्रभाकर जोशी यांनी सदर पुस्तकाचा घाट घातला आहे. ‘भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यविचार’ या विषयासंदर्भात मौलिक लेखन करणार्‍या दिवंगत प्रा. ब. लु. सोनार या आपल्या गुरुंच्या उपलब्ध नसणार्‍या पुस्तकांना नव्या पिढीपर्यंत पोहचविण्याचे काम यानिमित्ताने ते करीत आहेत. पण संबंधित विषयातील स्वतःच्या अभ्यासदृष्टीतून झालेले लेखनही त्यांनी येथे समाविष्ट केलेले आहे. पूर्वसूरींचे कृतज्ञ स्मरण करतानाच नवागतांना उजळ वाट दाखविण्याची ही भूमिका निश्चितच लक्षणीय आहे. साहित्याच्या स्वयंपूर्ण अस्तित्वाचे मर्म जाणून घेऊ इच्छिणार्‍यांना या पुस्तकाचा लाभ होईल असा विश्वास वाटतो.

    – आशुतोष पाटील

    Sahityavichar (Bharatiya Ani Pashchattya)

    275.00
    Add to cart