आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे पाहिले जाते. व्यापार माध्यमातून जगातील सर्वच देशांचा कमी-जास्त वेगाने आर्थिक विकास होऊ लागतो. आंतरराष्ट्रीय व्यापार माध्यमातून प्रत्येक देश आपला विकास साध्य करण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांवरील अवलंबित्वातूनच जगातील विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो. व्यापार मुळात लाभ मिळविण्याच्या हेतुने केला जातो. एखादा देश आर्थिकदृष्ट्या कितीही संपन्न असला तरी संपुर्णत: स्वयंपूर्ण असू शकत नाही. कारण देशात सर्वच वस्तू व सेवांचे पुरेशा प्रमाणात उत्पादन होतेच असे नाही. वस्तू व सेवांची देशांतर्गत टंचाई दूर करण्यासाठी आणि आर्थिक विकासासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते, तसेच देशातील वस्तू व सेवांचे अतिरिक्त उत्पादन खपविण्यासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते. व्यापारातून देशा-देशांमध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय संबंध निर्माण होतात, सहकार्याची आणि एकात्मकतेची भावना निर्माण होते, विकसित देश विकसनशील देशांना विकासासाठी मदत करतात.
प्रस्तुत पुस्तकात आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ-हानी, विविध सिद्धांत व धोरणे, व्यापारतोल, विदेशी विनिमय दर, विदेशी गुंतवणूक, बहुराष्ट्रीय कंपन्या, विदेश चलन गंगाजळी, विविध आंतरराष्ट्रीय संस्था व परिषदा, जागतिक वित्तीय संकट 2008, रुपयाचे अवमूल्यन आणि परिवर्तनियता इ. मुद्द्यांचा सविस्तर परामर्श घेतलेला आहे.
– प्रा. डॉ. एन. एल. चव्हाण
Antarrashtriy Vyapar And Vyavahar