मानवी समाजाच्या इतिहासात 15 वे शतक हे नवविचार, नवसमाजरचना, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे ठरले. येथूनच आधुनिक युगास प्रारंभ झाला. याच कालखंडात मानवतावाद निर्माण होऊन ‘मानव’ हा विचाराचा केंद्रबिंदू बनला. या कालखंडात अनेक विचारवंत उदयास आले. त्यांच्या नवविचारांनी वैचारीक क्रांती होण्यास सुरुवात झाली. ज्ञानाचा प्रसार सर्वत्र होवू लागला. राजसत्ता व धर्मसत्तेला हादरे बसू लागले. 18 व्या शतकात अमेरिकेमध्ये औद्योगिक क्रांती आणि फ्रान्समध्ये फे्रंच राज्यक्रांती झाल्याने त्यांचा परिणाम सर्वत्र होवून तत्कालिन काळात त्याचे प्रतिबिंब उमटले. राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक इत्यादी सर्वच क्षेत्रात संपूर्ण जगावर परिणाम करणार्या या घटना होय. सर्वच देशात नवे विचार, नवी राजकीय, सामाजिक व्यवस्था अशा नवयुगाचा प्रारंभ झाला.
प्रस्तुत पुस्तकात फ्रेंच राज्यक्रांती ते राष्ट्रसंघाची निर्मिती व कार्यापर्यंतचा जगाचा इतिहास देण्यात आला आहे. तसेच नेपोलियन बोनापार्ट, व्हिएन्ना काँग्रेस, बिस्मार्क, कैसर विल्यम दुसरा, रशिया-जपान युद्ध, त्रिराष्ट्र मैत्री करार, पहिले महायुद्ध, अमेरिकेचा महासत्ता म्हणून उदय, समाजवाद, भांडवलशाही, साम्यवाद संकल्पना, रशियन राज्यक्रांती, पॅरिस शांतता परिषद, विविध तह व करारनामे, राष्ट्रसंघ व दुसर्या महायुद्धाकडे वाटचाल या प्रमुख विषयांचा समावेश असून विषयाची मांडणी साधी सोपी व सर्वांना समजेल अशी आहे.
Aadhunik Jagacha Itihas (1780 te 1919)