कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) हे एक निरागस, निगर्वी, अतिसंवेदनशील असं साधंभोळं तद्वतच श्रद्धाळू व्यक्तिमत्त्व आहे. खेडेगावात जन्मलेल्या आणि तिथेच आपलं बालपण व्यतीत केलेल्या कवयित्रीने ग्रामीण जीवनाशी आपली बांधिलकी जपली आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना, सालोसाल नापिकी याचा त्यांच्या नेणीवेत खोलवर उमटलेला ठसा, त्या शहरात आल्यावरही पुसला गेला नाही.
मुळात ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतरित झालेल्यांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीला आता गाव राहिलं नाही! तिकडचा निसर्ग, तिथलं जीवन, एकमेकांना धरून चालणारी तिथली माणसं, गावभर लहरणारी मायेची झुळुक या साऱ्यांना अलीकडची पिढी पारखी झाली आहे. खेडेगावातील माणुसकीच्या पंगती शहरातून उठताना दिसत नाहीत; हे बदलतं वास्तवही कवयित्रींनी शब्दातून मांडलं आहे. आपल्या बोलीभाषेतून जीवनाचं तत्त्वज्ञान सोपं करून सांगणाऱ्या खानदेशातील बहिणाबाईंच्या लेकींची संख्या हळूहळू वाढत चालली आहे. त्यांचं आत्मभान जागृत होत, त्या आपल्या मातीशी इमान राखत सकस लेखन करू लागल्या आहेत, ही लेवागणबोली आणि एकूणच मराठी भाषेसाठी जमेची बाजू आहे.
आनंदाच्या भ्रामक कल्पना गोंजारत, संवेदना लोप पावत चालल्याच्या वर्तमानात, माणसातलं माणूसपण हरवत चालल्याच्या काळात माणसातल्या चांगुलपणाला आवाहन करत ही कवयित्री शब्दधन पेरीत चालली आहे. ‘सारी एकाच धरतीची लेकरं’ असं मानणाऱ्या, समतेची भावना जोपासत माणसं जोडणाऱ्या, ‘भावनेचा होता गुंता – कविता होऊन सोडवितो’ असं म्हणणाऱ्या ‘जावे गुंफित अक्षरे’ हा कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) यांचा पहिलावहिला कवितासंग्रह तमाम मराठी वाचकांना भावेल असाच आहे.
आजूबाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंगांची अंतर्मनात सातत्याने नोंद घेत त्यांना शब्दरूप देत साकारलेल्या या कवितासंग्रहाची साहित्यविश्वानं निश्चितच दखल घ्यावी, अशी कवयित्री सौ. संध्या भोळे (बोंडे) यांची काव्यप्रतिभा आहे. त्यांना मनापासून सदिच्छा!
– प्रा. किसन वराडे, अंबरनाथ
Jave Gunfit Akshare