स्त्री भू्रणहत्या आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार एक सामाजिक समस्या या विषयासंदर्भात पुस्तक आपल्या हातात देतांना मनस्वी आनंद होत आहे. स्त्री जीवनाचे अस्तित्वच नष्ट करणारा हा विषय प्रत्येकाला विचारप्रवृत्त करणारा आहे. आज दर हजारी पुरूषांमागे स्त्रीयांचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे. मुलगाच हवा या अट्टाहासाने स्त्रीभ्रूणांची गर्भातच हत्या केली जाते. याला कुटूंबातील स्त्री-पुरूष या दोघांचीही संमती असते. प्रत्येक पुरूषाला आज आई, बहिण, पत्नी असावी असे वाटते परंतु जन्माला येणारा गर्भ मुलीचा नको असतो. पुरूषप्रधान संस्कृतीत वावरणारी स्त्री ही आजही चूल आणि मूल या दृष्टीने वाटचाल करीत आहे. कुटूंबात स्त्रीला काही बाबतीत स्वातंत्र्य असले तरी महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तिला सहभागी करून घेतले जात नाही ही आजही स्त्री जीवनाची शोकांतिका ठरली आहे. स्त्रीयांच्या वेदना आजही तीव्र स्वरूपाच्या आहे. पारंपारिक मानसिकतेमुळे आजही स्त्री पुरूषांना दुय्यमच वाटते. त्यामुळेच समाजात स्त्रीयांची परवड होत असतांना दिसते.
स्त्री-पुरूषांमधील या असमतोलामुळेच स्त्रीयांवरील अत्याचार भविष्यात वाढणार आहे. आज सामाजिक, राजकिय, आर्थिक सर्वच क्षेत्रात स्त्रीयांवरील अत्याचारात सातत्याने वाढ होत आहे. पूर्वी देखील या अत्याचाराला स्त्री बळी जात होती. परंतु आज प्रसार माध्यमाच्या जाळ्यांनी ते विमान जनमानसात तात्काळ पोहोचत आहे. त्याचा रोष पुन्हा स्त्रीयांवरच लादला जात आहे. चुकीच्या श्रद्धा समजुती आणि पुरूषसत्ताक व्यवस्थेच्या दांभिक प्रवृत्तीतून स्त्रियांवर जोर, जुलूम, जबरदस्ती केली जाते. कधी तरी, रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी अशा अत्याचाराची स्त्री सतत बळी ठरत असते. समाजात प्रखरपणे सुरू असलेली हुंडा पद्धती देखील स्त्री जन्म नाकारण्याचे एक प्रमुख कारण बनत आहे. या हुंडा प्रथेविरोधी समाज किंवा शासनाने कठोर भूमिका घ्यावी. आज मूठभर शिक्षित स्त्रीयांकडे सत्ता असली तरी समाजातील 80% स्त्रीया सतत अन्याय, अत्याचाराला बळी जात आहे. सुखवस्तूत वावरणारी स्त्री देखील पूर्णपणे सुरक्षित नाही. साधन आणि संदर्भ बदलून आजही तिला उपेक्षित आणि वंचित केले जाते ही वास्तविकता आहे. ढोबळ मानाने स्त्रीयांसंदर्भातील पुरूषी मानसिकता बदललेली असली तरी ती विशिष्ट क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे. स्त्रियांच्या अत्याचारासंदर्भात जितकी स्त्री जबाबदार आहे. त्यापेक्षा अधिक पुरूष जबाबदार आहेत. या परिस्थितीला तेथील सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि तात्त्विक परिस्थितीही तितकीच जबाबदार आहे. समाजातील स्त्री भ्रूणहत्या रोखल्या जाव्या, स्त्रीयांवरील अत्याचार कमी व्हावे, स्त्रीयांच्या जीवनात न्यायाची नवीन पहाट उगवावी, स्त्री भ्रूणहत्या व अत्याचाराची कारणे, परिणाम समाजासमोर येऊन या गहन समस्येबद्दल जाणिव जागृती निर्माण व्हावी व समाजात अनुकूल बदल व्हावा हीच अपेक्षा.
Stri Bhunhtya Ani Streeyanvaril Vadhate Atyachar Eka Samajik Samsya