मानव कल्याणाची कविता
संवेदनशील कवी अजय भामरे यांचा ‘क्रांतीलहर’ हा पहिला कवितासंग्रह वाचकांसमोर येत असल्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये समतेसाठी चळवळ आणि विषमतेसाठी वळवळ अशा दोन गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतात. विषमतेसाठी चालणारी वळवळ आजही समाजाला पोखरण्याचे काम करीत आहे.
कवी अजय भामरे या विषमतेविरुद्ध आपल्या शब्दांमधून युद्ध छेडतांना दिसत आहेत. त्यांची कविता मानवाचे कल्याण होण्यासाठी धडपडताना दिसते. एका नवोदित कवीने पहिल्याच कविता संग्रहामध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणे हे अतिशय परिपक्वतेचे लक्षण आहे. त्यांच्या चौरेचाळीस कविता चौरेचाळीस विषयांना समोर आणून समाजाला बदलासाठी आवाहन करताना दिसतात. यावरून कवीची सर्वव्यापी दृष्टी लक्षात येते. आंबेडकरी चळवळीत तयार झालेला कार्यकर्ता त्यांच्या प्रत्येक कवितेत प्रतिबिंबित होताना दिसतो.
चंगळवाद आणि भौतिक वादाने ग्रासलेल्या आजच्या काळात समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणारा हा कवी नामनिराळा वाटतो. त्यांची ‘क्रांतीलहर’, ‘सत्यशोधक सूर्य’, ‘भिमसुर्य’, ‘परिवर्तनाची पहाट’, ‘क्रांतीचे गीत’ या कवितांमधून तर ते मानव मुक्तीचा जाहीरनामा वाचकांसमोर मांडतात. भारतीय संविधानातील मूल्यांप्रती त्यांची बांधिलकी त्यांच्या प्रत्येक कवितेतून जाणवते.
फुले-शाहू-आंबेडकरांच्या समताधिष्ठित समाजाचं स्वप्न पाहणाऱ्या या कवीला आपल्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!
– प्रा. भरत आत्माराम शिरसाठ
अध्यक्ष- समतावादी साहित्य शिक्षक मंडळ
Krantilahar