महाराष्ट्रात इ.स. 1818 मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजी सत्तेचा उदय झाला. इंग्रजांनी महाराष्ट्रात सत्ता प्राप्त केल्यानंतर नवे शैक्षणिक धोरण अंमलात आणले. शिक्षण प्रसारासाठी नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या. शाळांची निर्मिती केली. एत्द्देशियांना शिक्षण देण्यासाठी, धर्म प्रचारासाठी, विविध विषयांवरची पुस्तके निर्माण केली. विविध स्वरुपात, प्रकारात धार्मिक वाङ्मय मराठी भाषेतून निर्माण केले. अर्वाचीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासात प्रारंभ काल हा साधारणत: इ.स.1818 मानला जातो. त्याची उत्तर सीमा विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या इ.स. 1874 साली सुरु झालेल्या निबंधमाला’पर्यंत संबोधली जाते.
इ.स. 1818 नंतरच्या अर्वाचीन मराठी वाङ्मयात इंग्रजी शिक्षणाच्या नव्या जाणिवांबरोबर, जुने वाङ्मय प्रकारही नव्या स्वरुपात साकार झाले. शिक्षणाचा प्रसार, मुद्रणाची व्यवस्था, वाचनाची आवड यांचा परिणाम म्हणून वाङ्मयाची सतत वाढ होत गेली. वाङ्मयाच्या क्षेत्रात नवे विचार, नवे सिद्धांत, नवे संप्रदाय, साहित्य विचार निर्माण झाले. बदलणार्या गतीमान मानवी जीवनाबरोबर साहित्याचे स्वरुपही पालटले. मराठी वाङ्मयाची कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, कविता, साहित्य विचार, समीक्षा विचार इत्यादी प्रकारात विपूल प्रमाणात निर्मिती होत गेली. वाङ्मय प्रवाहात ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, मुस्लिम साहित्य, ख्रिश्चन साहित्य, जनवादी साहित्य इत्यादी प्रवाहान्वये निर्मिती झाली.
मराठी वाङ्मयात विविध प्रकार आणि प्रवाहांमुळे निर्माण झालेल्या साहित्याने विपुलता आलेली आहे. भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर आजचा वर्तमान आहे. आजचा वर्तमान हा उद्याचा भूतकाळ आहे. काळ हा अखंड आहे. माणूस हाच प्रारंभ असून, विश्वाच्या पाठीवर माणूस असेपर्यंत वाङ्मय निर्मिती आहे. त्यामुळे वाङ्मयाचा शेवट अज्ञात आहे; असे म्हणणे अतिशयोक्त होणार नाही.
अर्वाचीन कालखंड सुमारे दोनशे वर्षांचा आहे. प्राचीन कालखंडाच्या मानाने तसा लहान आहे. तरीही ह्या कालखंडात विविध प्रवाह, प्रकारांनी विविधापूर्ण वाङ्मय निर्मिती झालेली आहे. महाराष्ट्राच्या वाङ्मयीन समृद्धतेचा, विपुलतेचा विवेचक परामर्श घेण्याच्या हेतु:स्तव म्हणजेच सदरील पुस्तक लेखन होय.
Arvachin Marathi Wagmayacha Itihas