परिवर्तन हे सृष्टीचे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार समाजही अत्यंत वेगाने बदलत आहे. सतत बदलणार्या परिस्थितीत मनुष्य आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे. या बदलत्या परिस्थितीबरोबर त्या गतीने स्वत:मध्ये बदल करणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. अशा वेळी विविध प्रकारच्या वर्तन समस्या निर्माण होतात. समस्याग्रस्त व्यक्तीला इतरांच्या मदतीची आवश्यकता भासते. अशा प्रसंगी त्याला समुपदेशन मानसशास्त्राच्या साहाय्याने वर्तन समस्येमुळे निर्माण झालेला स्वत:वरील ताण कमी करता येईल. त्याचबरोबर काळाची गरज विचारात घेता समस्याग्रस्तांना मदत करणार्या व्यक्तींची उणीव आहे. त्यातही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मदत करणार्या व्यक्तीची उणीव आणखीनच अधिक प्रमाणात आहे. अलीकडच्या काळातील मानसशास्त्राचा अभ्यासक समुपदेशन मानसशास्त्र ह्या विषयाचा व्यवहारात कितपत उपयोग करता येईल या दृष्टीने विचार करू लागला आहे. किंबहुना त्याचा वापर करणे त्याने सुरुही केले आहे.
सदर पुस्तकात समुपदेशन म्हणजे काय? येथपासून ते समुपदेशनाचे मूल्यमापन कसे करावे, ह्यामध्ये समुपदेशकाची नैतिक मूल्य तसेच समुपदेशनासाठी कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहे ह्याचाही विचार केलेला आहे. या पुस्तकाची उपयोगिता किंवा गरज विचारात घेता हे पुस्तक महाराष्ट्रातील विद्यापीठ क्षेत्रात विद्यार्थी, वाचक व प्राध्यापकांबरोबरच सर्व विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांस, सामान्य वाचकांस याचा उपयोग होईल, अशी आशा वाटते.
Samupdeshan Manasshastra