-
कृषी भूगोल
कृषी व्यवसाय हा मानवाचा प्राचीन काळापासून चालत आलेला व्यवसाय आहे. आपल्या भारत देशाचा विकास संपूर्णत: शेतीवर अवलंबून आहे. शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन राहिलेले नसून व्यापारी तत्त्वावर तिचा उपयोग होवू लागला आहे आणि म्हणून शेतीकडे ‘उद्योग’ म्हणून पाहण्यात येवू लागले. पूर्वी शेती पारंपारिक पद्धतीने केली जात होती त्यावेळी कृषीतून निघणारे उत्पन्न मर्यादित स्वरूपाचे होते. नंतर औद्योगिक क्रांतीने कृषीतंत्रज्ञान विकसित होऊन कृषी अवजारांमध्ये अमूलाग्र बदल घडून आले. याच बरोबर जादा उत्पादन देणार्या आणि सुधारित बी-बियाणांचा वापर करण्यात येऊ लागला. किटकनाशकांचा, तणनाशकांचा वापर होऊ लागला. सेंद्रीय व रासायनिक खतांचा उपयोग कृषी उत्पन्न वाढीसाठी होऊ लागला. या सर्व घटकांमुळे कृषी उत्पादनात वाढ झाली. अशा या व्यवसायाचा भौगोलिक दृष्टीकोनातून केलेला अभ्यास म्हणजे ‘कृषी भूगोल’ होय. या विषयात कृषीविषयक सर्व अंगांचा सखोल अभ्यास अंतर्भूत आहे. 18 व्या शतकापासून कृषी विषयक अभ्यासास चालना मिळाली. त्यापूर्वी सॉवर आणि व्हॉवीलाव्ह यांनी कृषी आणि पशुपालन या संबंधी अभ्यास केला. 18 व्या शतकामध्ये कृषीवर होणार्या प्राकृतिक घटकांचा परिणाम कृषी भूगोलात अभ्यासला गेला. कृषी भूगोलात या संबंधीचा अभ्यास त्या काळात केला गेला. 19 व्या शतकामध्ये विविध प्रदेशातील कृषी विषयक अभ्यास केला गेला. औद्योगिक क्रांतीच्या कालावधीत शेतीतही क्रांती झाली. हरितक्रांतीस चालना मिळाली. कृषीत झालेला बदल अभ्यासण्याचे कार्य 20 व्या शतकाच्या कृषी भूगोलाने केले. हवामान व शेती यासंदर्भातला अभ्यास कृषी भूगोलामध्ये केला गेला. मृदेची सुपिकता व मृदा उत्पादनक्षमतेचा अभ्यास अलिकडच्या कृषी भूगोलात समाविष्ट आहे. जलसिंचनाचा शेतीवर होणारा परिणाम कृषी भूगोलात अभ्यासला जात आहे. अशाप्रमाणे काळानुसार कृषी भूगोलाच्या स्वरूपात बदल होत आहेत. व हे बदल सतत होत राहणार आहेत. म्हणून कृषी भूगोलाचे स्वरूप हे गतिमान बनले आहे.
Krushi Bhugol