जात, धर्म, रूढी, परंपरा, लिंग यांच्या नावावर होणारे शोषण व त्यांचे समाजातले दृश्य रूप सर्वांनाच लाजविणारे आहे. हे आपण युगे न युगे बघतो आहोत. दलित समाजाचा सुशिक्षित वर्ग आपल्या लेखणीतून अनुभव व्यक्त करू लागला. सर्वप्रथम आत्मकथनांची लाटच या शोषितांच्या वेदनेतून विकसित झाली. दिवसेंदिवस आधुनिकीकरणाच्या नावाखाली, शिक्षणाच्या, पैशाच्या, राजकीय सत्तेच्या बळावर पद्दलितांवरील अत्याचार वाढतच आहेत. पूर्वीतरी त्याचे स्वरूप सौम्य होते मात्र आज वासनांधांची पहिली नजर ही दलित, पिडीत, मागासवर्गातील स्त्रीकडेच वळते. स्त्रीयांच्या शारीरिक, मानसिक पिंडाचे पृथ्थकरण शब्दरूपात कुणालाही करणे अशक्य आहे. स्त्रीच्या वेदना ह्या पुरूषांना, स्त्रीला व समाजाला कधीही समजू शकणार नाहीत. बलात्कारीत स्त्रीची वेदना दुसरी स्त्री समजून घेत नाही याचे दाखले आपणाला साहित्यात मिळतात. एवढेच नव्हे तर न्यायालयीन संघर्षात दाद मागताना सर्वांसमक्ष असो वा ‘इन कॅमेरा’ बंद खोलीत असो. धारदार प्रश्नांची सरबत्ती असतेच. एकवेळेस बलात्काराची वेदना कमी, मात्र या प्रश्नांची वेदना आयुष्यभर टोचणारी ठरते.
स्त्री आज प्रतिकार करताना दिसते, मात्र हा प्रतिकार किती व कसा दडपला जातो याची उदाहरणेदेखील आपल्या आजूबाजूला, परिसरात, गावात; कदाचित आपल्या घरातदेखील आहेतच. मात्र हिच स्त्री जेव्हा प्रतिकारातून प्रतिशोध घेण्याचं ठरवते तेव्हा मात्र ती स्वत:ला देखील संपवून टाकते. तिचा प्रतिशोध तर पूर्ण होतो मात्र तिला तिचे स्थान मिळत नाही- समाजात व घरात देखील. न्यायालयीन प्रक्रियेत तिला आत्मरक्षणाचा हक्क तर आहे मात्र प्रतिशोधाचा नाही. आत्मरक्षणात समोरच्या व्यक्तीच्या वासनेला अधिक महत्त्व व स्त्रीच्या प्रतिकाराला नगण्य. असे का? याचे उत्तर शोधता शोधता या हिंदी भाषेतील नावाजलेल्या कथांचा स्वैर अनुवाद करून आपल्या जाणकार वाचकांसमोर आम्ही ठेवीत आहोत.
Pratishodh : Yaun Shoshanacha