साने गुरुजींनी खानदेशाच्या गौरवार्थ ‘वैभवेश’ हे विशेषण वापरलेले आहे. बी.एन. हा या वैभवेशाचा पुत्र खरा, पण एका गरीब अल्पभूधारक शेतकरी कुटुंबात जन्मलेला आणि बालपणीच मातृवियोगाचा आघात पचवलेला पुत्र! खडतर आयुष्यात त्याने जे काही सोसलं, ते एखाद्या शोकात्म कादंबरीसारखं आहे. पण आयुष्यात हे असलं हलाहल पचवणाऱ्या या माणसाच्या हृदयात मात्र खानदेशी गोडव्याचं अमृत आहे! अगदी बहिणाबाईंच्या कवितेतला गोडवाच म्हणा ना! मातेविना पोरका असा हा मुलगा एक मातृहृदयी पुरूष म्हणून जगला. साधेपणा, ऋजुता, पारदर्शीपणा याच्या अंगात मुरलेला. याचं विद्यार्थीप्रेम हे हृदयाच्या अंतर्हृदयातून पाझरलेलं. याच्यातला सामाजिक सेवाभाव म्हणजे जणू कानबाईने दिलेला कानमंत्रच! एका व्यक्तीचा काही व्यक्तींनी केलेला गौरव, एवढेच या गौरवग्रंथाचे महत्त्व नाही. माझ्या मते त्याला एक प्रतिकात्मक मूल्य आहे. बीएन ही निव्वळ एक व्यक्ती नाही, तर ती एक चालतीबोलती संस्था आहे. ते केवळ एक अभ्यासू शिक्षक नाहीत, तर एका वैचारिक परंपरेचे डोळस प्रतिनिधी आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाचे वा वैचारिक पंथाचे ‘लेबल’ त्यांनी लावलेले नाही. पण त्यांच्यामध्ये समाजवादी आणि सर्वोदयी विचारांचा सुंदर समन्वय झालेला आहे. महाराष्ट्रात साने गुरूजींमध्ये आणि देव-जावडेकर-भागवत वगैरे आचार्य-परंपरेमध्ये गांधीवाद, लोकशाही, समाजवाद यांचा जो सुरेख मेळ साधला गेलेला आढळतो, तसा तो बीएन यांच्या जगण्यावागण्यातून प्रत्ययास येतो. शिक्षकी पेशाचं अवमूल्यन झालेल्या काळात असे शिक्षक आचार्य कुलाचं एखादं ओॲसिस उभारतात. शिक्षण क्षेत्राचं बाजारीकरण आणि मूल्यांचा ऱ्हास चालू असताना असे काही ‘अव्यवहारी’ लोक स्वार्थाच्या बाजारातसुद्धा परमार्थाची गुढी उभारतात. वर्किंग अवर्स, वेतन आयोग, बाळसेदार बायो-डेटा हे सगळं गरजेचं. वाटत असेल अध्यापकांना; पण त्यापलीकडे जी व्यक्ती पोहोचली, अध्यापन हा जिने ‘धर्म’ मानला आणि शिक्षकी पेशातले सामाजिक उत्तरदायित्व जिने जाणले, तीच व्यक्ती शिक्षकी-पेशाला खऱ्या अर्थाने जागली, तिलाच खरा यतिधर्म समजला! बीएन हे या जातकुळीतले शिक्षक आहेत. म्हणून निवृत्तीसमयीचा त्यांचा गौरव हा निव्वळ उपचार नव्हे, ती नुसती सत्काराची शाल नाही, तर प्रेरणेची मशाल आहे.
– राजा दीक्षित
सुप्रतिष्ठित प्राध्यापक,
इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
Khandesh Vaibhav : Kal, Aaj Aani Udya