सतराव्या शतकातील हिंदुस्थान म्हणजे निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही व मुगलशाही या इस्लामी सत्तांचा युद्धमय काळ होय. या सत्तांमध्ये हिंदू धर्माला न्याय मिळत नव्हता. हिंदूची मंदिरे फोडली जात होती, मंदिरातील मूर्त्या नष्ट केल्या, हिंदू स्त्रियांचे पातिव्रत्य भ्रष्ट केले. शहाजी राजे व जिजाबाई यांनी आपल्या जीवनात या सर्व शासन सत्तांचा कडवट अनुभव घेतला होता. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये मरगळ निर्माण झाली होती त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शून्य बनलेल्या समाजात राष्ट्रीयत्व व स्वधर्म जागृत करण्याचे कार्य केले. महाराष्ट्रातील जनतेला त्यांनी एकत्र करून त्यांच्यापुढे स्वराज्याची कल्पना मांडली. जे मराठा सरदार प्रारंभी या कल्पनेच्या विरोधात होते, त्यांना त्यांनी पराजित करून धडा शिकविला. अफजलखान, शाहिस्तेखान यासारख्या प्रतिष्ठीत सरदारांना पराभूत केले. स्वराज्यासाठी उपयुक्त घटकांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये असलेले असामान्य धैर्य, पराक्रम, शक्ती-युक्तीच्या यथायोग्य वापराचे भान तसेच सामान्य मराठी जनांनी दिलेली तोलामोलाची साथ यामुळे स्वराज्याची कल्पना प्रत्यक्षात अंमलात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम राजे, महाराणी ताराबाई यांनी प्रचंड संघर्ष केल्याने मोगलशाही खिळखिळी झाली. तद्नंतर छत्रपतीपदी शाहू महाराज आल्यानंतर पेशवेपदाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. मराठ्यांच्या सत्तेचा हिंदुस्तानात लौकिक पसरला.