मनुष्य हा बुध्दीजीवी प्राणी आहे. परमेश्वराने मानवाला बुध्दीची देणगी देऊन सर्व प्राणीमात्रात सर्वश्रेष्ठ ठरविले आहे. मनुष्य हा बुध्दीचा वापर करुन नवनवीन संशोधनाद्वारे आपले जीवनमान दिवसेंदिवस अत्याधिक सुकर बनवित आहे. मानवी समूहात काही लोक सर्जनशील वृत्तीचे असतात. त्याच्या ठायी सर्जनशीलता असते. या सर्जनशीलतेतूनच नवनवीन शोध लावून ते या शोधांचा संपूर्ण मानव जातीला उपभोग घेण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. परंतु असे शोध लावण्यात त्यांनी आपली बुध्दी, वेळ, श्रम आणि पैसा खर्ची घातला असतो. त्यामुळे अशा शोधकर्त्यांना त्यांच्या कार्याच्या श्रेयाबरोबरच योग्य तो आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे, तसेच त्यांच्या शोधाचा दुरुपयोग होता कामा नये या विचारातून बौध्दिक संपदा हक्क ही संकल्पना उदयास आली.
बौध्दिक संपदा हक्क हा औद्योगिक आणि साहित्य, कला विषयक मानवी मनाच्या निर्मितीवरील विविध हक्कांचा समुच्चय आहे. त्यात पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क, औद्योगिक संकल्पचित्र, भौगोलिक विशेषतादर्शक चिन्ह, सुक्ष्म जीव-जंतूंसाठी पेटंट, रोपांच्या नवीन जाती/नमुन्यांना संरक्षण आणि परंपरागत ज्ञानभांडारास संरक्षण इत्यादी अनेक वेगवेगळ्या हक्कांचा समावेश आहे. नवे संशोधन, नवी उत्पादने आणि नव्या प्रणाली यांच्या माध्यमातून आर्थिक विकासाला चालना मिळत असते. त्या द़ृष्टिने बौध्दिक संपदेचे देशाच्या आर्थिक विकासातील महत्व लक्षात येत असले तरी बौध्दिक संपदा हक्कांविषयीच्या काही समस्या निर्माण होतात. प्रस्तुत ग्रंथात बौध्दिक संपदा म्हणजे काय? बौध्दिक संपदा हक्काचा इतिहास, बौध्दिक संपदा हक्काची गरज किंवा आवश्यकता, बौध्दिक संपदा हक्काचे स्वरूप आणि बौध्दिक संपदा हक्कांच्या समस्या यांचा ऊहापोह करण्यात आला आहे.
Bauddhik Sanpda Hakka Swarup Aani Samasya