सामाजिक मानसशास्त्राचा विकास सावकाश होत गेला. ग्रीक तत्ववेत्ता प्लेटोच्या मते, व्यक्तीच्या विचारांवर व वर्तनावर त्याच्या समाजाचा प्रभाव पडतो. शिक्षणाच्या माध्यमातून मनुष्य त्याच्या जन्मजात प्रवृत्ती बदलू शकतो. थॉमस मूर यांनी सामाजिकरणाचे महत्त्व प्रतिपादित केले. कार्ल मार्क्स यांनी समूहाचे अस्तित्व मूलभूत मानले व समाजरचनेचा माणसाच्या स्वभावाशी, अभिवृत्तींशी आणि वर्तनाशी संबंध लावला. 1908 ते 1924 च्या दरम्यान सामाजिक मानसशास्त्र हे स्वतंत्र विज्ञानशाखा म्हणून उदयास आले. 1908 मध्ये विल्यम मॅकडुगल यांनी सामाजिक मानसशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले. त्यात मनुष्याच्या जन्मजात प्रवृत्तींवर, सहजप्रवृत्तींवर त्याचे सामाजिक वर्तन अवलंबून असते असे मत मांडले. 1950 ते 1970 च्या दरम्यान फेस्टिंजर, केली, ड्युश, थिबट, शॅक्टर यांनी सामाजिक मानसशास्त्रात उल्लेखनीय कार्य केले. 1960 च्या दशकात सामाजिक आंतरक्रियेच्या जवळपास सर्वच बाजूंवर म्हणजे आंतरव्यक्तिक आकर्षण, आरोपण, सामाजिक संवेदन, आज्ञापालन, अनुसरिता, आक्रमकता इत्यादी बाबींवर संशोधन करण्यात आले. 1980 च्या दशकात सामाजिक मानसशास्त्रात बोधात्मक दृष्टिकोनाचा अभाव व मानसशास्त्रीय तत्वांचे उपायोजन करण्याचा प्रभाव याबाबत उत्कर्ष झाला. व्यक्तीच्या वर्तनाचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी सामाजिक मानसशास्त्राची निर्मिती झाली.