पूजा व प्रार्थनेसाठी आदर्श गुणांनी संपन्न अशी सगुण मूर्ती डोळ्यासमोर असावी लागते. यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेची निवड करता येऊ शकते. समाज ज्यांच्यासाठी मंदिर होते, सत्य हाच ज्यांचा परमेश्वर होता, सेवा ज्यांची प्रार्थना होती, अहिंसा ज्यांची भक्ती होती, मानवता टिकवण्याचा ज्यांचा संकल्प होता, नैतिकता ज्यांचा श्वास होता आणि निष्काम कर्म ज्यांचा ध्यास होता त्या राष्ट्रपित्या महात्म्याच्या चारित्र्याची निरलस व निष्पाप मनाने साधना करणे म्हणजे पूजा किंवा प्रार्थना ठरू शकते. पूजा चरित्राची व्हावी, चित्रांची नव्हे. महात्म्याच्या चरित्रांचे वाचन व मनन व्हावे हा प्रामाणिक हेतू “महात्मा – ध्यास व्हावेत तरुणांचे” या पुस्तिकेचा आहे.