प्रा. कैलास सार्वेकर हे माझे गेल्या पस्तीस वर्षापासूनचे मित्र होते. ते ग्रामीण साहित्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते होते. महाराष्ट्रातील ग्रामजीवनाशी, आदिवासी जीवनाशी समरस होऊन ते ग्रामीण साहित्य चळवळीचे काम करीत होते. ग्रामीण साहित्याचे संशोधनही करीत होते. त्यांनी केलेले संशोधन मराठी साहित्य संशोधनात मोलाची भर टाकणारे आहे. विशेष म्हणजे ते स्थानिक बोलीच्या अभ्यासातही रमून गेले. कदाचित त्यांनी केलेला हा बोलींचा अभ्यास मराठीतील पहिलावहिला अभ्यास असेल. नवापूरसारख्या गुजरातच्या सीमारेषेवरील गावात राहून संशोधन करणे, चळवळ करणे ही अधिक अवघड गोष्ट असते. परंतु कैलास सार्वेकर हे सारे निष्ठेने करीत होते. ग्रामजीवनासंबंधीच्या आंतरिक प्रेमाने करीत होते. सार्वेकरांनी ग्रामीण जीवनातील दु:ख, दारिद्य्र, श्रद्धा व अंधश्रद्धाही पाहिलेल्या-साहिलेल्या होत्या. मराठी साहित्यविश्वातील सार्याच वाङ्मयीन चळवळी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने निष्प्रभ करून टाकल्या. तरीही ग्रामीण साहित्य, ग्रामीण जीवन, ग्रामीण साहित्य चळवळ यांच्याशी शेवटपर्यंत ज्यांनी स्वत:ची बांधिलकी सांगितली, त्यात कैलास सार्वेकर आहेत; यात शंकाच नाही.
– नागनाथ कोत्तापल्ले
Navvadottari Marathi Gramin Sahitya