मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचं अध्ययन करण्याचं महत्त्वाचं कार्य अर्थशास्त्र करते. ही मानवी वर्तणूक उपभोक्ते, उत्पादक, वितरक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. त्यांचे कार्य अर्थव्यवसथेला गतिमान करणार ठरते. यातून अर्थशास्त्रीय ज्ञानशाखा उत्पादन, उपभोग, विनिमय, वितरण यांचे सैद्धांतिक विश्लेषण करतात. यासाठी रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये अर्थशास्त्रीय अभ्यास शाखांचे दोन भागात विभाजन केले आहे. (1) सूक्ष्मलक्षी अध्ययन (2) समग्रलक्षी अध्ययन. हे विभाजन आर्थिक विकासाची धोरणे निश्चित करण्यासाठी व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. या दोन्ही अभ्यासशाखांच्या आधारावरच ‘परिचयात्मक अर्थशास्त्र’ या क्रमिक पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना सैद्धांतिक संकल्पनांची व त्यांची व्यावहारिक प्रासंगिकता कशी महत्त्वपूर्ण आहे याचा थोडक्यात परिचय करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे त्यांच्यात अर्थशास्त्राच्या अध्ययनाची गोडी निर्माण व्हावी, त्याला आपल्या भविष्याला आकार देता यावा व सामान्य माणसांच्या आर्थिक प्रश्नांची त्याच्यात समज निर्माण व्हावी, या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी त्याने धडपड करावी हा प्रयत्न आहे.
म्हणून या पुस्तकात मागणी, पुरवठा, रोजगार, पैसा, आधुनिक बँकींग, व्यापार, सरकारचे उत्पन्न-खर्च, आर्थिक विकास, नियोजन आयोग, निति आयोग, व्यावसायिक जीवनातील सांख्यिकीचे योगदान, या संकल्पनांची त्याला ओळख होण्यास मदत होईल. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्यांना दिशादर्शक ठरेल यात शंका नाही.
Parichyatmak Arathashastra