-
एल्गार वंचितांचा
राष्ट्रपतींच्या यादीत अनुसूचित 45 जमाती आहेत, त्यापैकी फक्त 12 जमातींना लाभ मिळतो; बाकी 33 जमाती या लाभांपासून वंचित असतात, त्या वंचित जमातींचा आक्रोश, विद्रोह या ‘एल्गार वंचितांचा’ या डॉ. प्रकाश सपकाळे यांच्या कवितासंग्रहात आविष्कृत झाला आहे.
हे षडयंत्र आहे. आदिवासी कोळी जमातीच्या 4 गटांपैकी फक्त सोनकोळी गटाचा समावेश इतर मागासवर्गात असून कोळी ढोर- टोकरे कोळी, कोळी महादेव, कोळी मल्हार या तिन्ही गटातील आदिवासी कोळी यांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये आहे. तथापि त्यांना लाभांपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र केले गेले आहे. आदिवासींनाच आदिवासींविरुद्ध उभे करून मुद्दाम संभ्रमाचे वातावरण केले गेले आहे. हलबा, ठाकूर, माना, गोवारी इ.33 जमाती अशा उपेक्षित राहिल्या आहेत. त्यांच्या भावना, संवेदना, विचार, विद्रोह प्रातिनिधिक स्वरूपात या काव्यसंग्रहात अविष्कृत केल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित या कवितांमध्ये वंचित जमातीतील कार्यकर्ते यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळून उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्याय, अत्याचार यांच्याविरुद्ध लढण्याचे बळ या कवितांमधून मिळते. संविधानिक व न्याय्य हक्कांसाठी लढण्याचे बळ मिळत आहे. संघटन वाढत आहे. स्फोटक अशा रसायनांचा जणू हा संग्रह आहे.
‘एल्गार वंचितांचा’ या काव्यसंग्रहातील विद्रोह अपूर्व असा आहे. हा वंचितांचा एल्गार माणुसकीचे शत्रू असणाऱ्या, अनुसूचित जमातींना वंचित ठेवणाऱ्या सर्व घटकांविरुद्ध आहे. -
तावडी माटी
‘तावडी माटी’तल्या कविता या प्रेम, पत्निप्रेम, मातृत्व, निसर्गाची विविध रूपे, धर्म-अध्यात्म-प्रबोधन, सद्यकालीन राजकारण व सामाजिक परिवर्तने तसेच संकीर्ण अशा विविधतेने नटलेली आहे. प्रेमकवितेतील नायिकेच्या धीटपणाचा अनुबंध हालाच्या ‘गाथा सत्तसई’तील नायिकांशी जाणवतो तसा आदिबंधाशीही वाटतो. सृजनशील अनिमा विविध रूपात अविष्कृत होत विभ्रमातून अविष्कृत होत अनिमसला निर्मितीला प्रेरणा देण्यास भुलवत मातृत्वाचे सुख भोगते. यातील निसर्गप्रतिमांचे सौंदर्य अपूर्व आहे. स्त्रियांच्या अनेक रूपांचे दर्शन या कवितेतून होते. निसर्गाच्या विविध रूपांचे परिणामकारक चित्रण, माणुसकी हाच धर्म आणि त्याचे आचरण करणारा तोच खरा संत, बाकी स्वतःचे स्तोम माजवून शोषण करणारे अध्यात्माच्या टपर्या चालविणारे स्वघोषित परमपूज्य हे दांभिक असून त्यापासून सावध राहण्याचे कवीने केलेले आवाहन, राजकारणामुळे भावाभावात पडलेली फूट व बायकोच राजकारणी नवर्याच्या महत्त्वाकांक्षेचं झालेलं साधन, भ्रष्टाचार, बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे निर्माण झालेले कौटुंबिक-सामाजिक प्रश्न आणि आत्महत्या न करण्याचे आवाहन अशी अनेक परिमाणे या कवितेत आहेत.
कवीची भावात्मक समाजाभिमुखता, आशावाद, तावडी माटीविषयीचा अभिमान सर्वत्र अविष्कृत होतो. हा अविष्कार संतसाहित्य व लोकसाहित्याने अंगिकारलेल्या अष्टाक्षरी ओवीतून केला आहे. या माटीची देशीयता आणि कवीची आत्मनिष्ठा ही जीवनमूल्येच या कवितेची वाङ्मयमूल्ये होत. साहित्य अकादमीने ‘भारतीय साहित्याचे निर्माते’ या प्रकल्पांतर्गत प्रकाशित केलेल्या ‘बहिणाबाई चौधरी’ या पुस्तकाचे लेखक, भाषाविज्ञान व व्याकरण यावर विशेष प्रभुत्व असलेले कवी प्रकाश सपकाळे यांनी या कविता खानदेशी तावडी बोलीत केल्या आहेत. या बोलीची ओळख त्यांच्या बहिणाईची गाणीची निर्मितिप्रक्रिया संवेदनशीलतेने उलगणार्या ‘खोप्यामधी खोपा’ या कादंबरीतून तसेच ‘बहिणाईची गाणी’मधून रसिक वाचकांना झालेली आहे. तावडी बोलीचे सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा प्रत्यय या कवितासंग्रहातून येतो.– प्राचार्य डॉ. रा. गो. चवरे
Tavdi Mati
-
-
बहिणाईची गाणी : शैलीवैज्ञानिक समीक्षा
एखाद्या कवीच्या समग्र कवितांची शैलीवैज्ञानिक समीक्षा केलेला मराठीतील कदाचित हा पहिलाच प्रयत्न ठरावा.
शैलीविज्ञानावर सैद्धांतिक मांडणी केलेले लेखन मराठीत फारच थोडे आहे. उपयोजन केलेली समीक्षाही तशी दुर्मीळच. प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे बहिणाबाईंचा ध्यास घेतलेले, अनेकांगी अभ्यास असलेले चिंतनशील व वस्तुनिष्ठ विचार करणारे अभ्यासक आहेत. ऐतिहासिक, वर्णनात्मक, सामाजिक भाषाविज्ञान तसेच तुलनात्मक भाषाविज्ञान, बोलीभाषाविज्ञान आणि व्याकरण यांचे गाढे अभ्यासक या नात्याने त्यांचा अधिकार मोठा आहे. त्यांच्याशिवाय अशा विषयाला हात घालण्याची हिंमत कोणीच करू शकत नाही. या मौलिक ग्रंथामुळे अभ्यासकांनाही दिशा प्राप्त होईल असा विश्वास वाटतो. शैलीविज्ञानाच्या अंगाने बहिणाबाईच्या गाण्यांचा अभ्यास मराठी समीक्षेत झालाच नव्हता ती उणीव ‘बहिणाईची गाणीः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ या मौलिक संशोधन ग्रंथाने भरून काढली आहे. या क्षेत्रातील अभ्यासक, समीक्षकांसाठी हा ग्रंथ ‘माईलस्टोन’ ठरावा. -
बहिनाईना गाना ‘बहिणाईची गाणी’चा अहिराणी अनुवाद
‘बहिणाईची गाणी’ चे गारूड 1952 पासून मराठी मनावर कायम आहे. ‘बहिनाईना गाना’ हा बहिणाईची गाणी अहिराणी बोलीत अनुवाद करणारा आगळावेगळा उपक्रम आहे. एका बोलीतून दुसऱ्या बोलीत अनुवादाचा हा पहिलाच प्रयत्न ठरावा. बहिणाबाईंच्या गाण्यांची निर्मितिप्रक्रिया सहृदयपणे उलगडून दाखवणारी ‘खोप्यामधी खोपा’ ही कादंबरी, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ‘बहिणाबाई चौधरी’ हा काव्यचिकित्सा करणारा मोनोग्राफ, ‘बहिणाईची गाणी ः शैलीवैज्ञानिक समीक्षा’ इ. पाच सहा पुस्तकांमधून बहिणाबाईंचे काव्यकर्तृत्व वस्तुनिष्ठपणे, विविध अंगांनी मांडणारे प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे या अनुवादाच्या माध्यमातून बहिणाबाईंच्या भाषेबद्दलचे गैरसमज तर दूर करतातच, त्यासोबतच बहिणाबाईंच्या गाण्यांची अहिराणी बोलीत नवनिर्मितीदेखील त्याच ताकदीने, त्याच अष्टाक्षरी छंदात रसिक वाचकांना उपलब्ध करून देतात. अनुवादविज्ञानाचे भान सांभाळून आणि बोली रूपांतराच्या मर्यादांची जाण ठेवून केलेला हा, ‘बहिनाईना गाना’ नामक अनुवाद बहिणाबाईंच्या काव्यास्वादाला पूरक आणि पोषक ठरावा.
– प्रा.ह.भ.प. चत्रभूज पाटील
-
माही माय बहिनाई
‘बहिणाईची गाणी’ चे गारूड 1952 पासून मराठी मनावर कायम आहे. बहिणाबाईंच्या गाण्यांची निर्मितिप्रक्रिया सहृदयपणे उलगडून दाखवणारी ‘खोप्यामधी खोपा’ ही कादंबरी, साहित्य अकादमीने प्रकाशित केलेला ‘बहिणाबाई चौधरी’ हा काव्यचिकित्सा करणारा मोनोग्राफ, ‘बहिणाईची गाणीः शैलीवैज्ञानिक समीक्षा’, अनुवादविज्ञानाचे भान सांभाळून आणि बोली रूपांतराच्या मर्यादांची जाण ठेवून केलेला ‘बहिणाईना गाना’ हा अहिराणी बोलीतील अनुवाद हा आगळावेगळा उपक्रम इ. पाच सहा पुस्तकांमधून बहिणाबाईंचे काव्यकर्तृत्व विविध अंगांनी मांडणारे प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे बहिणाईचा घेतलेला ध्यास व अभ्यास,चिंतन यातूनच ‘माही माय बहिनाई’ हा खानदेशी – तावडी बोलीतील काव्यसंग्रह साकार झालेला आहे.
एखादा विषय (थीम) घेऊन त्यावर मराठी भाषेत लिहिलेला पाच पन्नास कवितांचा संग्रह काढणे, ही कल्पना आता नवीन राहिलेली नाही. क वयित्री बहिणाबाई चौधरी आणि त्यांची कविता या विषयावरील कवितांची एक छोटेखानी पुस्तिका इंद्रजित भालेराव यांच्यासारख्या प्रसिद्ध कवीने यापूर्वी काढली. आहे. प्रा.डॉ. प्रकाश सपकाळे यांचा ‘माही माय बहिनाई’ हा खानदेशी – तावडी बोलीतील अष्टाक्षरी छंदातील 50 कवितांचा संग्रह बहिणाबाईंचे व्यक्तिमत्त्व व कवित्व, तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरण, बहिणाबाईंच्या काव्याचे प्रयोजन आणि त्यांच्या काव्याची चिकित्सक व आस्वादक समीक्षादेखील या कवितेतून वाचकांसमोर मांडते.
अस्सल तावडी बोलीतील या कविता बहिणाबाईंच्या गाण्यांशी जातकुळी सांगतात त्यामुळे बहिणाबाईंची भाषा अहिराणी, लेवा गणबोली की खानदेशी – तावडी बोली हा प्रश्नही आपोआप निकालात निघतो. कारण ‘बहिणाईची गाणी’ आणि ‘माही माय बहिनाई’ या संग्रहातील कवितांची बोली एकच आहे. बहिणाबाईंची कविता हा कवीच्या चिंतनाचा आणि चिकित्सेचा विषय असल्याने केवळ भक्तीपोटी केलेल्या आस्वादक समीक्षेपेक्षा सपकाळेंची कविता वेगळी ठरते.
बहिणाबाईंच्या कवितेचे समग्र आकलन होण्यासाठी ‘माही माय बहिनाई’ या संग्रहातील कविता उपयुक्त ठरतील यात शंका नाही.– प्रा.ह.भ.प. चत्रभूज पाटील