‘पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य’ हा ग्रंथ म्हणजे आदिवासींचे लोकजीवन, लोकसाहित्य, संस्कृती, रुढी, परंपरा इत्यादीची ओळख करुन देणारा आहे. आदिवासी जमातीच्या 47 जमाती आहेत. या जमातीपैकी वारली, कोकणा, ठाकर, गोंड, पारधी, प्रधान अशा बर्याचशा जमाती पुढे आलेल्या आहेत. म्हणजे शहरी जीवनाशी त्यांचा संपर्क झालेला आहे. जगाची त्यांची ओळख झालेली दिसते. त्यांनी साहित्यामध्येपण आपले स्थान निश्चित केलेले आहे. त्यापैकी भिल्ल ही आदिवासी जमात. पावरा, कोकणा या जमाती पश्चिम खानदेशातील आहेत. त्यासुध्दा आता तसा प्रयत्न करीत आहे. आपआपल्या समाजाजवळ परंपरागत मौखिक भरपूर लोकसाहित्य आहे, व तो आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे. तो जतन करण्याच्या उद्देशाने काही अभ्यासक अभ्यासूवृत्तीने त्या साहित्याकडे जाणिवपूर्वक पाहून ते जतन करत आहेत. त्यापैकीच प्रा. डॉ. पुष्पा गावीत यांनी पश्चिम खानदेशातील आदिवासींचे लोकसाहित्य या विषयाचे संशोधन करुन या साहित्याला समाजाभिमुख बनवण्याचा प्रयत्न केला आहे. या ग्रंथामध्ये आदिवासींच्या संपूर्ण लोकजीवनाचा अभ्यास त्यांनी केलेला दिसतो. पहिल्या प्रकरणामध्ये भिल्लांचे लोकजीवन यामध्ये त्यांनी विवाहपध्दतींचा सविस्तरपणे असा परिचय आपणास दिला आहे. सर्व जमातींचा आपण आदिवासी जमाती म्हणून उल्लेख जरी करत असलो तरी प्रत्येक जमातीची संस्कृती, रुढी, परंपरा, त्यांचे देवदैवत, आचार, विचार हे आपणास भिन्न भिन्न प्रकारचे दिसून येतात.
Pahschim Khandes Adivasi Lok Sahitya