मराठी साहित्याला प्रदीर्घ असा इतिहास आहे. मध्ययुगीन मराठी वाङ्मय, अर्वाचीन मराठी साहित्य, आधुनिक साहित्य, नवसाहित्य, साठोत्तरी साहित्य, नव्वदोत्तरी (जागतिकीकरणाच्या काळातील) साहित्य अशा पद्धतीने मराठी साहित्याची वाटचाल झालेली दिसून येते. मराठी साहित्याचा हा संपूर्ण इतिहास, हा संपूर्ण परीघ विस्ताराने मराठी साहित्य व भाषा या विषयात पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतेलेल्या विद्यार्थ्यांना, मराठी विषयाचा शिक्षक, सहाय्यक प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना माहीत असायला हवा. म्हणून मराठी विषयाचा सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील नेट व राज्य पातळीवरील सेट या परीक्षांमधील अभ्यासक्रमाच्या दहाव्या घटकामध्ये त्या त्या कालखंडातील मराठीतील सर्वोत्कृष्ट अशा 24 साहित्यकृतींचा समावेश करण्यात आलेला आहे. या दहाव्या घटकातील साहित्यकृती, त्यावरील समीक्षा एकाच पुस्तकात कुठेही उपलब्ध होत नाही. तेव्हा विद्यार्थी, अभ्यासक यांची ही गरज लक्षात घेऊन हा समीक्षा ग्रंथ सिद्ध केलेला आहे. मराठी विषयाच्या अभ्यासू, चिकित्सक, साक्षेपी अभ्यासकांनी आपल्या लेखांमधून त्या-त्या साहित्यकृतीचे विविध पैलू, त्या साहित्यकृतीतील कथानक, आशय याचा समाजाशी, विविध विचारप्रणाल्यांशी असलेला संबंध, त्यांचे मराठी साहित्यविश्वात असलेले नेमके स्थान, महत्त्व यांचे सूक्ष्म असे विवेचन करून त्यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यातून गेल्या 835 वर्षांतील महत्वाच्या ग्रंथांचा, लेखकांचा आढावा, वाटचाल डोळ्यासमोर उभी राहते. त्यामुळे हा ग्रंथ वाचक, विद्यार्थी व अभ्यासकांना उपयुक्त ठरेल व ते या ग्रंथाचे मनापासून स्वागत करतील, असा विश्वास वाटतो.
– डॉ. राहुल भालेराव पाटील
Sahityaswad